Satara News: दहा गावे अन्‌ २८ हजार लोकसंख्येला एक तलाठी 
सातारा

Satara News: दहा गावे अन्‌ २८ हजार लोकसंख्येला एक तलाठी

महसूल विभागातील दिरंगाईचा विद्यार्थी, ग्रामस्थांना फटका; शेतकऱ्यांची गैरसोय

पुढारी वृत्तसेवा
वैभव पाटील

उंडाळे : दोन सजे, दहा गावे, 28 हजार लोकसंख्या आणि महसूल विभागाचे काम करणारा एकच ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) अशी गंभीर अवस्था कराड तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या काले व परिसराची झाली आहे. एकाच तलाठ्याला सर्व गावांच्या कामांचा भार पेलवत नसल्याने ग्रामस्थांची महसूल विभागातील कामांना दिरंगाईने होत आहे. तर सध्या शाळा महाविद्यालयांच्या प्रवेशाची गडबड सुरु असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.

कराड तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून काले गावाची ओळख आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे 18 हजार असून या गावांतर्गत वाड्या व मळे येतात. काले येथे महसूल विभागाचे मंडल कार्यालय आहे. या मंडल कार्यालयांतर्गत चार सजे असून यामध्ये काले, नारायणवाडी, मालखेड, वाठार, नांदगाव, सजे येतात. या सजा अंतर्गत काले मंडलात एकूण पाच तलाठी कार्यरत आहेत. त्यापैकी काले व नारायणवाडी या सर्वात मोठ्या सजात फक्त एकच तलाठी कार्यरत आहे. मंडलाच्या अन्य गावांचा विचार करता मालखेड, कासार शिरंबे, वाठार, रेठरे, नांदगाव, मनव येथे तलाठी कार्यरत आहे. पण काले आणि नारायणवाडी या दोन सजात मात्र एकच तलाठी कार्यरत आहे.

काले व नारायणवाडी या सजात एकूण दहा गावे आहेत. यामध्ये काले सजात पाच व नारायणवाडी सजात पाच गावे आहेत. काले सजात कालेटेक, संजय नगर, चपने मळा, जुजारवाडी ही पाच गावे तर नारायणवाडी सजात तर धोंडेवाडी, चौगुलेमळा, मुनावळे, डिचोली, नारायणवाडी ही पाच गावे येतात. या गावची लोकसंख्या आणि सजातील लोकसंख्या याचा विचार करता एकाच तलाठ्यावर मोठ्या प्रमाणात कामाचा भार पडलेला आहे. त्यामुळे तलाठ्याची काम करण्याची इच्छा असूनही सामान्य जनतेची कामे वेळेवर होत नाहीत, असे चित्र आहे.

याउलट सजातील अन्य गावात तलाठी असल्याने कारभार सुरळीत सुरू आहे. पण काले व नारायणवाडी या दोन्ही सजातील स्थानिक ग्रामस्थांना तलाठी नसण्याने कामाचा मोठा फटका बसत आहे. सध्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू असून या विद्यार्थ्यांना तलाठी कार्यालयातून लागणारे दाखले देणे, शासनाच्या कर्जमाफी योजनेचेही काम व माहिती देण्यासाठी तलाठ्यांकडून ऑनलाईन ग्रीस्टिक करून घ्यावे लागते. त्याशिवाय कर्ज माफी होत नाही.

हे जादा काम सध्या तलाठी यांच्याकडे आहे. तसेच काले विभागात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचा वार्ड रचना व जनगणनेचा कार्यक्रम सुरू आहे. त्यामध्ये तलाठ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय नियमित असणारे तलाठी कार्यालयाचे कामकाज याचा विचार करता एकच तलाठी नेमके कोणते काम करणार? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT