खंडाळा : खंडाळ्यातील निंबुरमळा नावाच्या शिवारातील विहिरीत पाय घसरून पडल्याने बुडून एकाचा मृत्यू झाला. संतोष जाधव ( वय 49 ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची नोंद खंडाळा पोलिस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, विहिरीमधील चिखलात अडकून विहिरीच्या पायरीवर आदळून संतोषचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
संतोष हे बुधवारी सकाळी पत्नी मनिषा यांना जनावरांना चारा घेवून येतो असे सांगून गेले होते. मात्र, बराच वेळ ते घरी परत आले नाहीत म्हणून दुपारी त्यांना फोन लावला असता त्यांचा मोबाईल बंद लागला. यानंतर मनीषा यांनी मुलांना शेतात पाठवले. यावेळी पुतण्या यश याने
मनिषा यांना संतोष यांची दुचाकी शेतात असून एक चप्पल विहिरीच्या कठड्याजवळ व दुसरी चप्पर विहिरीत पडल्याचे सांगितले. विहिरीत चप्पल आढळल्याने कुटूंबियांनी शिरवळ रेक्स्यू टीमच्या मदतीने त्या विहिरीतील पाण्यात शोध घेतला. परंतु, ते सापडले नाहीत. रात्र झाल्याने संध्याकाळी 6 च्या सुमारास शोधमोहीम थांबवली.
दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले. या जवानांनी कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोध घेतला असता दुपारी 2 वाजता मृतदेह आढळून आला. यानंतर तो पाण्याबाहेर काढला. यावेळी संतोष जाधव यांच्या डोक्याला मोठी जखम झालेली होती.