सातारा : दिवाळीची सुट्टी संपली असली तरी जिल्ह्याचे मिनीमंत्रालय समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेत मात्र अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची दिवाळी सुरुच आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सर्व शासकीय कार्यालये सुरु झाली असली तरी जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात शुकशुकाट जाणवत होता. शुक्रवारी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मात्र गैरसोयीला समोरे जावे लागले.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. 10 ऑक्टोबरपासूनच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये परजिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारनंतरच अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावाकडे जाण्यासाठी हाफ डे घेतले होते. दि. 18 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत सुट्टी होती. तर काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवार दि. 24 ऑक्टोबर रोजी रितसर रजा काढली आहे. त्यामुळे पुन्हा दि. 25 व 26 रोजी शनिवार व रविवारची सुट्टी आली आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना सलग 9 दिवसांची दिर्घ सुट्टी मिळाली आहे. बहुतांश कर्मचारी परजिल्ह्यातील असल्याने पुन्हा गावाकडे जायला मिळत नसल्याने अनेकांनी सुट्टी काढली होती. दिवाळी सुट्टीनंतर शुक्रवारी सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये पुन्हा एकदा सुरु झाली.
मात्र नेहमी वर्दळ असलेल्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये सकाळपासूनच शुकशुकाट जाणवत होता. काही बोटावर मोजण्याइतपतच वरिष्ठ अधिकारी कार्यालयात तळ ठोकून होते. तसेच काही विभागात तर निवडक कर्मचारी काम करताना दिसत होते. त्यामुळे झेडपीच्या सर्व मजल्यासह विस्तारीत इमारत परिसरात शांतता निर्माण झाली होती. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी सुरुच असल्याचे चित्र पहावयास मिळाले. कामानिमित्त आलेल्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्यामुळे प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली.