खटाव तालुक्यातील येरळवाडी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यावरून येरळा नदी पात्रात सुरू असलेला विसर्ग. Pudhari Photo
सातारा

Satara News | विसर्ग नियंत्रण यंत्रणा नसल्याने खटाव, माणला अलर्ट

येरळवाडी, नेर, आंधळी, राणंद प्रकल्प भरल्याने सिंचन विभागाच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

खटाव : खटाव तालुक्यातील येरळवाडी आणि नेर तर माण तालुक्यातील आंधळी व राणंद हे मध्यम प्रकल्प सततच्या पावसाने पूर्णक्षमतेने भरुन वाहू लागले आहेत. या सर्व प्रकल्पांना विसर्ग नियंत्रण यंत्रणा नसल्याने दोन्ही तालुक्यात अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पांमुळे येरळा व माणगंगा नद्यांची पातळी वाढून नदीकाठच्या गावांना धोका पोहोचू शकतो हे ध्यानात घेऊन संबंधित ग्रामपंचायती, नगरपंचायती आणि नगरपरिषदांना सतर्क राहण्याच्या सूचना सिंचन विभागाने दिल्या आहेत.

माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांमध्ये या वर्षी मे महिन्यातच पूर्व मोसमी पावसाने थैमान घातले होते. इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात 11.79 दलघमी क्षमतेचे नेर धरण भरुन सांडव्यावरुन येरळा नदीत वाहू लागले होते. पुढील चारच दिवसात दोन्ही तालुक्यातील सर्वात मोठे 32.80 दलघमी क्षमतेचे येरळवाडी धरणही ओव्हर फ्लो झाले होते. ही दोन्ही धरणे येरळा नदीवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही धरणातून येरळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात येरळा नदीला मोठा पूरही आला होता.

माण तालुक्यालाही पूर्वमोसमी पावसाने झोडपल्याने जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात 7.43 दलघमी क्षमतेचे आंधळी आणि 6.42 दलघमी क्षमतेचे राणंद धरण भरले होते. आंधळी धरण माणगंगा नदीवर आहे. या धरणातील विसर्ग माणगंगा नदीतून म्हसवडमार्गे राजेवाडीकडे जातो. माण आणि खटाव तालुक्यातील येरळवाडी, नेर, आंधळी आणि राणंदसारख्या मध्यम प्रकल्पांना विसर्ग नियंत्रण यंत्रणा नाही. सदर धरणे द्वारविरहित (अनगेटेड) असल्याने सगळा विसर्ग नदीपात्रात जातो. सध्या ही सर्व धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे आता पडणार्‍या पावसाचे सर्व पाणी या धरणांच्या सांडव्यावरुन नदीपात्रात येत आहे. परिणामी नद्यांची पाणीपातळी वाढत आहे. येणार्‍या कालावधीत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मोठा पाऊस झाला तर या धरणांमधील विसर्गही मोठ्या प्रमाणावर वाढून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. येरळा आणि माणगंगा नद्यांच्या काठावर अनेक गावे, शहरे आणि वस्त्या आहेत. या नद्यांवर अनेक पूल आहेत. पाणीपातळी वाढल्यावर मोठा धोका उद्भवू शकतो हे ध्यानात घेऊन कृष्णा सिंचन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांनी नदीकाठी न जाण्याबरोबरच संबंधित ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदांनी अनियंत्रित विसर्गाबाबत अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गेल्या वर्षी होता तब्बल 6 हजार क्यूसेक विसर्ग

गेल्या वर्षीही खटाव तालुक्यात ऑगस्ट महिन्यात तुफान पाऊस झाला होता. दुष्काळी खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणातून 20 ऑगस्ट रोजी विक्रमी 6 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग येरळा नदीपात्रात सुरु होता. त्या विसर्गामुळे येरळा नदीला मोठा पूर येवून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. आताही दोन्ही तालुक्यातील धरणांमधील अनियंत्रित विसर्गामुळे तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, हे ध्यानात घेऊन सिंचन विभागाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT