सातारा : महागाई, बेरोजगारी, महिला, बालिकांवर होणारे अत्याचार, इंधन टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना केंद्र व राज्य सरकार यावर कोणतीच उपाययोजना करत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी सातारा शहरात भव्य मोर्चा काढला. तसेच पोवई नाका परिसरामध्ये ठिय्या मांडून चक्काजाम आंदोलन केले. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार पूर्णत: अपयशी ठरले असून सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले.
राष्ट्रवादी भवन येथून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री बाळासाहेब पाटील, साहिल शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, गोरखनाथ नलवडे, प्रवीण धस्के, नितीन शिंदे, नरेश देसाई, राजकुमार पाटील, सुनील काळेकर, सुवर्णादेवी पाटील, समिंद्रा जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभाग घेतला. मोर्चामध्ये बैलगाड्याही आणल्या होत्या. ‘आया बहिणींवर वार... फडणवीस सरकार गब्बर, महागाईने जनता त्रस्त सरकार सुस्त, इंधन दरवाढ थांबलीच पाहिजे, देवाभाऊ देवाभाऊ रडू नको राव.... माझ्या कांद्याला एक रुपया भाव...’ अशा जोरदार घोषणा देत हा मोर्चा पोवई नाक्यावर आला.
या ठिकाणी शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर या मोर्चातील नेते व कार्यकर्ते मुख्य चौकात ठिय्या मांडून बसले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गेले 12 वर्षे केद्रात भाजप प्रणित घटक पक्षाची सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमातून अक्षरश: भारतीय नागरिकांचे जगणे मुश्कील केलेले आहे. प्रत्येक दिवशी सूर्य महागाई वाढ झाल्याचे बातमी देऊनच उगवतो. नियोजनअभावी महागाईचा भस्मासुर सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसला आहे. केंद्र व राज्य सरकार बेरोजगारी रोखण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका आ. शशिकांत शिंदे यांनी यावेळी केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.