Satara Municipal Council 
सातारा

Satara News : सातारा पालिकेकडून ठेकेदारांना ६५ लाखांचा दंड

दै. 'पुढारी'च्या वृत्ताची शिवेंद्रराजेंकडून गंभीर दखल : निविदा प्रक्रिया पारदर्शकतेने राबवा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा पालिकेच्या एका विभागाने काढलेल्या ठेक्यांमधील गोलमाल दै. 'पुढारी'ने मंगळवारी 'सातारकरांच्या पैशावर ठेकेदारांचा डल्ला' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून चव्हाट्यावर आणला. या वृत्ताची गंभीर दखल सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली. याप्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून विधानपरिषदेची आचारसंहिता उठल्यानंतर निविदा प्रक्रिया पारदर्शकतेने राबवा, असे आदेश त्यांनी पदाधिकार्‍यांना दिले. संबंधित १४ ठेकेदारांना ६४ लाख ८० हजार ८१७ रुपयांचा दंड केल्याची माहिती नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष अ‍ॅड. डी. जी. बनकर यांनी दिली.

पालिकेतील एका विभागाने विविध कामांसाठी कर्मचारी पुरवणारी वेगवेगळी टेंडर काढली होती. या ठेक्यांमध्ये झालेले गैरप्रकार व खाबुगिरीवर दै. 'पुढारी'ने वृत्त प्रसिद्ध करून झोत टाकला. या वृत्ताने पालिकेसह जिल्ह्यात खबळबळ उडाली. नगरसेवकांमध्ये सकाळी-सकाळी फोनाफोनी सुरू झाली. प्रशासनाचीही तारांबळ उडाली. मुख्याधिकार्‍यांनी संबंधित ठेकेदारांची बैठक घेऊन झाडाझडती घेतली. 'पुढारी'च्या वृत्ताची मंत्री शिवेंद्रराजे यांनी गंभीर दखल घेत पदाधिकार्‍यांना आदेश दिले. हा काय प्रकार आहे? याप्रकरणाचा तातडीने खुलासा करा. याप्रकरणात गांभीर्याने लक्ष घाला. चुकीचे काही खपवून घेतले जाणार नाही. आचारसंहिता संपल्यावर नव्याने टेंडर प्रक्रिया राबवा. या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवा, असे निर्देश त्यांनी पदाधिकार्‍यांना दिले.

त्यानंतर नगराध्यक्ष मोहिते व उपनगराध्यक्ष अ‍ॅड. बनकर यांनी खुलासा केला. दै. 'पुढारी'त प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार वस्तुनिष्ठ चौकशी हाेणार आहे. कोणत्याही चुकीच्या बाबींना पाठीशी घातले जाणार नाही. सातारकर जनतेच्या कष्टाच्या पैशातून होणारा प्रत्येक रुपया जनतेच्या हितासाठीच खर्च झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पालिका कामकाजात आढळणार्‍या त्रुटींमध्ये सुधारणा करण्यात येतील. मुदत संपलेल्या ठेक्यांसाठी ई- निविदा रावबण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न विचारात घेता व विधानपरिषदेची आचारसंहिता असल्याने संबंधित ठेकेदाराकडून काम करून घेण्यात येत आहे.

गैरहजर कर्मचार्‍यांबाबत संबंधित संस्था व ठेकेदारांना दंड करण्यात आला आहे. चौगुले कन्स्ट्रक्शन (सातारा) या ठेकेदार एजन्सीला काळ्या यादीत घातले आहे. मे. इकोसेव्ह प्रायव्हेट लिमिटेड, इंदोर या एजन्सीला ६१ लाख ९० हजार दंड केला. इतर १२ ठेकेदारांना २ लाख ९० हजार ४१४ रुपये दंड केला. सातारकरांचे हित लक्षात घेता लवकरच नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्ष मोहिते यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT