Satara Drowning Case 
सातारा

Satara Drowning Case : पुसेसावळीतील माय-लेकीचा तलावात बुडून मृत्यू

मणेराजुरीतील घटना : पुसेसावळी परिसरावर शोककळा DrowningAccident

पुढारी वृत्तसेवा

पुसेसावळी : मजुरीसाठी सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी येथे गेलेल्या पुसेसावळीतील माय-लेकीचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे पुसेसावळीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सत्वला संतोष जाधव (वय २८) आणि मंजू संतोष जाधव (१०, रा. पुसेसावळी) अशी मृत माय-लेकीची नावे आहेत.

संतोष जाधव यांचे कुटुंब पावसाळी हंगामात मोलमजुरीसाठी मणेराजुरी परिसरात जात असते. महिनाभरापूर्वी ते पत्नी सत्वला, मुली मंजू व अंजू तसेच दोन लहान मुले अविनाश आणि रोहित यांच्यासह तेथे वास्तव्यास आले होते. बुधवारी दुपारी सत्वला जाधव या आपल्या चार मुलांसह चिमणखोरा पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्या कपडे धुण्यात व्यस्त असताना मुलगी मंजू अंघोळीसाठी तलावात उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने व पाय घसरल्याने ती खोल पाण्यात जाऊन बुडू लागली. मुलीला बुडताना पाहताच आई सत्वला यांनी तिला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. परंतु, दुर्दैवाने त्यांनाही पाण्याचा अंदाज आला नाही आणि दोघीही खोल पाण्यात बुडाल्या.

किनाऱ्यावर असलेल्या अंजू या लहान मुलीने हा प्रकार पाहताच आरडाओरडा केला. तसेच तिने तत्परता दाखवत मोबाईलवरून वडील संतोष जाधव यांना घटनेची माहिती दिली. संतोष जाधव आणि नागरिक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत माय-लेकीचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच विशाल टकले हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत अविनाश (वय ९) आणि रोहित (५) या चिमुकल्यांसमोरच त्यांच्या आई आणि बहिणीचा मृत्यू झाल्याने हृदय हेलावून टाकणारे चित्र निर्माण झाले. मुलांचा आक्रोश पाहून उपस्थित असलेल्याचे डोळे पाणावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT