सातारा

Satara News : माणमधील हजारो कुटुंबे ऊसतोडीसाठी स्थलांतरित

खरीप हातचा गेला, रब्बीची आशाही मावळली : मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

देवापूर : माण तालुक्यात दुष्काळाचे प्रखर चटके बसू लागले असून, त्याचा शेती आणि रोजगारावर गंभीर परिणाम होत आहे. पावसाअभावी खरीप हंगाम हातचा गेला असून रब्बीच्या पेरणीची आशाही मावळली आहे. शेतीतून उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी झाल्याने स्थानिक रोजगाराचे पर्यायही संपुष्टात आले आहेत. परिणामी, उदरनिर्वाहासाठी हजारो कुटुंबांनी मुलाबाळांसह ऊसतोडीसाठी स्थलांतराचा मार्ग स्वीकारला आहे.

माण तालुक्यात सध्या ३५ गावे आणि २१६ वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पिकांचे नुकसान आणि रोजगाराचा अभाव यामुळे मजुरांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरवर्षी तालुक्यातून ऊसतोडीसाठी मजुरांचे स्थलांतर होते; मात्र यंदा दुष्काळाच्या तीव्रतेमुळे स्थलांतराचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. ऊसतोडीसाठी पालकांसोबत स्थलांतर करणाऱ्या लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

कुटुंबासोबत गावोगावी जावे लागत असल्याने अनेक मुलांचे शिक्षण खंडित होते. माण तालुक्यातील ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी पुरेशा हंगामी शाळा किंवा वसतिगृहांची व्यवस्था नसल्याने ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच खासगी आश्रमशाळा उपलब्ध असल्याने स्थलांतरित मजुरांच्या सर्व मुलांना शिक्षणाची संधी मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे शासनाने या मुलांच्या शिक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT