सातारा : कोडोलीतील 9 वर्षाची चिमुरडी चिंगी शनिवारी सायंकाळी अचानक बेपत्ता झाली अन् आई-वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला. पोटच्या गोळ्यासाठी धावाधाव केली. पण चिंगीचा काय ठावठिकाणा लागेना. लेकीचं काय झालं असेल या विचाराने सैरभैर झालेले आई-वडिल पोलिस ठाण्यात गेले. त्यांची कैफियत ऐकून पोलिसही काळजीत पडले. चिंगीच्या शोधासाठी सुमारे 70 पोलिसांचा फौजफाटा व ग्रामस्थ सरसावले.
आख्खी रात्र शोधाशोध केली, परिसरातील दोन विहिरी रिकाम्या केल्या. शिवार ना शिवार धुंडाळलं. पण उपयोग होईना. सार्यांचीच चिंता वाढली असताना तब्बल 20 तासानंतर या प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली अन् चिंगी सापडली. पोटच्या गोळ्याला पाहताच आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला.
त्याचे झाले असे, चिंगी ही 9 वर्षाची मुलगी शनिवारी दुपारी 5 वाजता दुसरीत शिकणार्या तिच्या मैत्रिणीकडे खेळायला निघाली. तिची मैत्रिण घरापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर राहते. चिंगी झपझप पाऊले टाकत मैत्रिणीकडे पोहचली. दोघींनी खेळ मांडला. दोघी मैत्रिणींचा खेळ उशीरापर्यंत सुरु राहिला. इकडे चिंगी कुठं गेली यावरुन सांयकाळी 7 वाजल्यापासून गलका उडाला. परिसरात सर्वत्र शोधल्यानंतरही चिंगी सापडत नव्हती. कुटुंबिय परिसरातील नागरिक यांनी पुन्हा संयुक्तरीत्या शोध मोहीम राबवली. मात्र चिंगी बेपत्ताच.
चिंगी बेपत्ता झाल्याने अखेर सातारा शहर पोलिस ठाण्यात तिचे कुटुंबिय रात्री 10 वाजता दाखल झाले. 9 वर्षाची पोरगी बेपत्ता झाल्याने शहर पोलिसही हादरुन गेले. मुलीची माहिती, वर्णन, अंगावरील कपडे व आयकार्ड फोटो घेवून शहरातील सर्व पोलिसांना तिची माहिती पाठवण्यात आली. पीसीआर, बीट मार्शल तसेच पोलिसांचे पथक चिंगीच्या शोधाला लागले. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर मुलगी नेमकी कधी बेपत्ता झाली? हे समोर येईना. अखेर पोलिसांनी आजूबाजूला सीसीटीव्हीची पाहणी केल्यानंतर मुलगी 5 वाजता बेपत्ता झाल्याचे एका फुटेजवरुन स्पष्ट झाले. पोलिसांचे एक पथक सीसीटीव्ही तर दुसरे पथक मुलगी ज्यांच्यासोबत घराच्या परिसरात खेळत होती त्यांच्याकडे चौकशीला सुरुवात केली.
चौकशीत दोन अँगल पोलिसांना मिळाले. त्यानुसार पोलिसांनी दोघांची उचलाउचली केली. त्या संशयितांकडे पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. मात्र त्यातून काहीच हाती लागेना. मुलगी सापडत नसल्याने शहर पोलिस ठाण्यातील सर्वच पोलिसांना फोन करुन बोलावून घेण्यात आले. अशाप्रकारे शहरचे सुमारे 75 पोलिस चौका चौकात, अडगळीच्या ठिकाणी, फिरस्ते अशा सर्व ठिकाणी पोहचले. पहाट झाली तरी हाती काहीच लागले नाही. तोपर्यंत मुलीचा फोटो व त्याखाली तिची माहिती तयार करुन सोशल मिडीयावर प्रसारीत करण्यात आली. मुलीच्या बेपत्ताची माहिती मोबाईलवर व्हायरल झाल्यानंतर ज्याच्या घरी ती थांबली होती त्याने चिंगीचा फोटो पाहिला. तात्काळ त्याने शाळेतील मॅडमना फोन करुन संबंधित मुलीच्या पालकांचा नंबर घेवून संपर्क केला. पोलिस, कुटुंबियांनी धाव घेवून चिंगीला पाहिले असता ती सुखरुप होती.