खेड अपहार प्रकरणी सरपंच लता फरांदे अपात्र 
सातारा

Satara News : खेड अपहार प्रकरणी सरपंच लता फरांदे अपात्र

विभागीय आयुक्तांची कारवाई : गुन्हा दाखल करण्याचे सीईओंना आदेश

पुढारी वृत्तसेवा

खेड : खेड ग्रा.पंच्या ग्रामनिधीतील 16 लाख 77 हजार 143 रुपयांच्या आर्थिक अपहार व अनियमितता प्रकरणी लोकनियुक्त सरपंच लता अशोक फरांदे यांना दोषी ठरवत पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पदावरून हटवण्याचे आदेश दिले. तसेच शासन परिपत्रकानुसार पडताळणी करून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.

विविध विकासकामांमध्ये ग्रामनिधीचा सुमारे 16 लाख 77 हजार 143 रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार पुणे येथील अभिजित खेडकर, उल्हास अग्निहोत्री, अभिषेक हरिदास तसेच खेड येथील साहिल शेख यांनी केली होती. त्यानंतर पंचायत समितीच्या तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर केला. यानंतर जावली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन झाली.तिनेे ग्रामनिधीत 16 लाख 27 हजार 143 रुपयांचा आर्थिक अपहार व 50 हजार रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचा निष्कर्ष नोंदवला. यासाठी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना जबाबदार धरले. हा अहवाल जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर झाला.

त्यानंतर तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अतुल जाधव यांना निलंबित केले. पुढे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समितीचा अहवाल, संबंधित कागदपत्रे आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत तरतुदींचा अभ्यास करून विभागीय आयुक्तांकडे अहवाल पाठवला.या प्रकरणी विभागीय आयुक्तांनी आदेशात ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने होत असल्याने वित्तीय नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. तसेच व्यवहारात दक्षता न बाळगता कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत असल्याचे निरीक्षण नोंदवले .

आ. महेश शिंदे काय भूमिका घेणार? : यादव

खेड ग्रामपंचायतीवर आ. महेश शिंदे यांची सत्ता आहे. लोकनियुक्त सरपंच लता फरांदे यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराबाबत आम्ही वेळोवेळी ठोस भूमिका घेतली होती. एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीवर आ. महेश शिंदे यांचे नियंत्रण नव्हते का? तसेच ‌‘सरपंच दोषी ठरल्यास मी राजीनामा देईन‌’ असे त्यांनी जनतेसमोर सांगितले होते. आता अपहार सिद्ध झाल्यानंतर ते काय भूमिका घेणार, असा सवाल ग्रामपंचायतीचे सदस्य निखिल यादव यांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT