खटाव : पुसेगाव-कातरखटाव राज्यमार्गावरील खटाव येथे पेट्रोल पंपासमोर शनिवारी मध्यरात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर एका महिलेसह दोघे गंभीर जखमी झाले.
हभप वैभव दिलीप बर्गे ( वय ४५, रा. आरफळ कॉलनी रोड, कोरेगाव) असे मृताचे नाव आहे. या अपघाताबाबत संतोष भाऊसाहेब शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी मध्यरात्रीनंतर पावणेएक वाजता भाऊसाहेब शिंदे, त्यांच्या पत्नी अश्विनी शिंदे आणि मित्र वैभव बर्गे दुचाकी (एमएच ११ डीपी १८५३) वरून पुसेगावकडे जात असताना समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनावरील चालकाने भरधाव गाडी चालवून, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकीला धडक दिली. अपघातात शिंदे दाम्पत्य गंभीर जखमी झाले तर वैभव बर्गे यांना सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना बर्गे यांचा रविवारी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला.