वडूज : जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘जलसमृद्ध सातारा अभियानाला’ खटाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दुष्काळमुक्तीसाठी विविध कामांना गावागावांत वेग आला आहे. अभियान सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत तालुक्यात ११० वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी खटाव येथे वनराई बंधाऱ्याची पाहणी करून कामाचे कौतुक केले. तसेच संपूर्ण तालुक्यात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
१ ऑक्टोबर रोजी पुसेगाव ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांच्या उपस्थितीत जलतारा कामाला सुरुवात करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत वनराई बंधारे, जलतारा, शोषखड्डे, सलग समतल चर, गाळ काढणे आदी जलसंधारणाची कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या अभियानासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी जयवंत दळवी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. पंचायत समितीच्या सभापती वनिताताई दुबळे, उपसभापती रेश्माताई शेडगे तसेच सर्व पंचायत समिती सदस्यांचे सहकार्य मिळत आहे. प्रत्येक गावासाठी विशेष पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी दिली.
ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी विभाग, शिक्षण विभाग, उमेद विभाग तसेच व्हीबीजी रामजी योजना आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी लोकसहभागातून एकत्रितपणे काम करीत आहेत. प्रत्येक गावासाठी सात विस्तार अधिकाऱ्यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी पंचायत समितीचे मुख्य कार्यालय आणि संबंधित गाव यांच्यात समन्वय साधून अभियानातील कामांना गती देणार आहेत, असेही कदम यांनी सांगितले.