सातारा

Satara News : सातार्‍यात 'अतिक्रमण'मधून लाखोंची कमाई

गोरगरीबांवरच कारवाई : नगरपालिकेचा नियोजन शून्य कारभार

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा पालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी कारभार स्वीकारल्यापासून सातार्‍याच्या सुव्यवस्थेचा बोर्‍या वाजला आहे. एकीकडे दोन्ही राजे सातारा शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे काही नगसेवक अतिक्रमणांच्या माध्यमातून महिनाकाठी लाखो रूपयांचा मलिदा लाटत आहेत. गोरगरिबांवर बुलडोझर चालवायचा आणि बड्यांच्या अतिक्रमणांकडे डोळेझाक करायची हीच रीत सध्या सातारा पालिकेच्या 'नियोजन'शून्य कारभारात दिसत आहे. या दुटप्पीपणाबद्दल सातारकरांतून संताप व्यक्त होत आहे.

सातारा पालिकेने वर्षभरापूर्वी शहरात वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने नो हॉकर्स झोन तयार केले. मात्र, निवडणूक झाल्यानंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर विक्रेत्यांनी निर्धास्तपणे रस्त्यावर ठाण मांडले आहे. याला काही नगरासेकांचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वाहतुकीची पुन्हा कोंडी होऊ लागली आहे. मुख्याधिकारी विनोद जळक यांनी याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे काही भागात नगससेवक अतिक्रमणांच्या माध्यमातून महिनाकाठी लाखो रूपयांची कमाई करत असल्याची माहिती समोर आली आहे. अतिक्रमणांकडून नियमित 'वसुली' करायची आणि त्यांना संरक्षण द्यायचे आणि पालिकेच्या कारवाईपासून वाचवायचे हा 'धंदा' काहीजणांनी मांडला आहे.

सदरबझारमधील दगडी शाळा परिसरात तर विविध पार्लर, जीम सुरू आहे. या मिळकतींतून पालिकेच्या तिजोरीत एक रूपयाही भाडे जमा होत नाही. हा पैसा नक्की कुठे जातो? असा प्रश्न सातारकरांना पडला आहे. जिल्हा परिषद चौक ते जरंडेश्वर नाका रस्त्याच्या रूंदीकरणासाठी अतिक्रमणे अडथळा ठरत असतानाही कारवाई होत नाही. बोगदा ते समर्थ मंदिर चौक रस्ता रूंदीकरणाची मोहीम दोन महिन्यांपूर्वी पावसाळ्याच्या तोंडावर सुरू झाली. काही अतिक्रमणे निघाली आणि मोहीम अचानक गुंडाळण्यात आली. या मोहिमेचे पुढे काय झाले? अरूंद रस्त्यामुळे लोकांचे जीव जात असतानाही मुख्याधिकारी मात्र थंड आहेत.

अतिक्रमणांविरोधात अर्धवट मोहिमा राबवून गोरगरीबांवर कारवाई केली जात आहे. यातून निष्ठुरता दिसून येते. सातारा पालिकेचा शहर नियोजन विभाग केवळ पाहणी करतो आणि त्यानंतर 'बैठका' होतात. 'नियोजन'शून्य कारभारामुळे अतिक्रमणे वाढीस लागत आहेत. छ. शाहू मार्केट यार्डसमोरून बसस्थानकाकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. अपघातांचा धोका वाढला आहे. मात्र या अतिक्रमणांतूनही जोरात 'वसुली' सुरू असताना पालिकेच्या कारवाईत आता काही राम राहिला नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

सातार्‍याचे दोन्हीही राजे सातारा शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. मात्र, काही स्वार्थी नगरसेवक आपल्या खिशात भर घालण्यासाठी शहर बकाल करत सुटे आहेत. त्यामुळे अशा नगरसेवकांना आवर घालणे आवश्यक आहे. नगरपालिका कुणासाठी अतिक्रमणे पोसत आहे? पालिका प्रशासनाने या सर्व प्रकारांना ताडीने पायबंद घालावा आणि सातार्‍यातील सर्व अतिक्रमणे भेदभाव न करता हटवावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT