Food Adulteration 
सातारा

Satara News : हळदीत शिसे, मिरची पावडरमध्ये विटांचा चुरा

मसाल्याच्या पदार्थांना भेसळीचा तडका : विषारी रसायनांचा आरोग्याला धोका

पुढारी वृत्तसेवा

आदेश खताळ

सातारा : मसाल्याचे पदार्थ हे स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक असताना हळद, मिरची पावडर, धने, जिरे या पदार्थांमध्ये औद्योगिक क्षेत्रात वापरली जाणारी रसायने मिसळली जात आहेत. हळदीमध्ये मेटॅनिल यलो, शिसे क्रोमेट तर मिरची पावडरमध्ये बांधकामासाठी वापरल्या जाणार्‍या विटांच्या चुर्‍याची भेसळ केली जाते. धने व जिरे पावडरमध्ये लाकडाचा भुसा मिसळला जातो. मसाल्याच्या पदार्थांना भेसळीचा तडका दिला जात असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. रंग, चव आणि वजन वाढवण्यासाठी भेसळखोर थेट विषारी रसायने वापरत असल्याने जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने धाडसत्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

हळदीमध्ये मेटॅनिल यलो या कृत्रिम औद्योगिक रंगाची भेसळ केली जाते. वास्तविक हा रंग कापड उद्योगात वापरला जातो. उद्योग क्षेत्रात वापरला जाणारा रासायनिक रंग आता जेवणाच्या ताटात येऊ लागला आहे. काही भेसळखोरांनी यापुढे जात हळदीला चमकदार रंग देण्यासाठी शिसे क्रोमेट या अत्यंत विषारी रासायनिक संयुगाचा वापर चालवला आहे. मिरची पावडरमध्ये बांधकामासाठी वापरल्या जाणार्‍या मातीच्या विटांचा बारीक चुरा आणि कृत्रिम लाल रंग मिसळला जातो. यामुळे पावडरचे वजन वाढते आणि रंग अधिक गडद दिसतो. लाकडाचा भुसा आणि वाळू मिसळून धने व जिरे पावडरचे वजन वाढवताना भेसळखोर दिसत आहेत. भेसळ करण्यात भेसळखोरांचा हातखंडा आहे. त्यांच्यासाठी भेसळ करणे ही जणू कलाच बनली आहे, इतक्या सराईतपणे हा धंदा केला जातो.

हळद भेसळीची सुरूवात ही हळद दळण्याच्या गिरणीपासून होते. या गिरणीतच मेटॅनिल यलो किंवा शिसे क्रोमेट टाकले जाते. मिरची पावडरमध्ये विटांचा चुरा इतका बारीक करून मिसळला जातो की डोळ्यांनी तो ओळखता येत नाही. धने व जिर्‍यात लाकडाचा भुसा मिसळताना त्यावर थोडेसे तेल फवारले जाते. त्यामुळे भुसा चिकटून एकजीव दिसतो. पॅकिंगनंतर हे पदार्थ नामांकित ब्रँडच्या नावाने किंवा स्थानिक ब्रँडखाली बाजारात येतात.

मसाल्यातील भेसळीत मोठे रॅकेट कार्यरत आहे. ग्रामीण भागातील छोट्या गिरण्यांमध्ये येणार्‍या कच्च्या मालात भेसळ केली जाते. त्यानंतर शहरातील घाऊक बाजारात हा माल मोठ्या प्रमाणात विकला जातो. कमिशनवर किरकोळ दुकानदार हाच माल ब्रँडेड किंवा लूज स्वरूपात ग्राहकांना विकतात. या रॅकेटमध्ये गिरणी मालक, घाऊक व्यापारी, वाहतूकदार तसेच किरकोळ विक्रेते सामील आहेत. राजकीय वरदहस्त असल्याने अनेक भेसळखोर मोकाट फिरतात.

हळद पावडरमध्ये मेटॅनिल येलो मिसळल्यामुळे कॅन्सर होतो. या रसायनामुळे लिव्हरचे प्रचंड नुकसान होते. या रसायनाचा मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होतो. हळदीत मिसळल्या जाणार्‍या शिसे क्रॉमेटमुळे मेंदूचे नुकसान होतेच पण लहान मुलांच्या बौध्दिकतेवर त्याचा थेट परिणाम होतो. मिरची पावडरमध्ये मिसळल्या जाणार्‍या विटांच्या चुर्‍यामुळे पोट व आतड्यांचे विकार होतात. पोटात जळजळ होते. धने व जिरे यामध्ये लाकडाचा भुसा मिसळल्यामुळे पचनाचे विकार होऊन आतड्यांना इजा होते. लहान मुले, गर्भवती माता तसेच वृद्धांच्यासाठी हे अत्यंत धोकादायक आहे. शिसे क्रामेटमुळे मुलांच्या मेंदूच्या विकासावर कायमचा विपरित परिणाम होतो.

हळद, मिरची पावडर, धने, जिरे यांच्यासोबतच बहुतांश मसाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने मसाले बनवणारे कारखाने, गिरण्यांवर अचानक धाडी टाकणे आवश्यक आहे.

(क्रमश:)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT