महामार्गावरील डिव्हायडर रातोरात फोडले 
सातारा

Satara News : महामार्गावरील डिव्हायडर रातोरात फोडले

बोरगाव येथील प्रकार; प्रशासनाची मात्र डोळेझाक

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव परिसरात काही व्यावसायिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी महामार्गावरील डिव्हायडर अनधिकृतपणे फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी मध्यरात्री जेसीबीच्या सहाय्याने डिव्हायडर तोडण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिकांनी पाहिले. मात्र, या प्रकाराकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

महामार्गावरील डिव्हायडर हे वाहतुकीची शिस्त राखण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी उभारले जातात. डिव्‍हायडर फोडणे हा गुन्‍हा आहे. मात्र, काही व्यावसायिकांकडून आपल्या आस्थापनांकडे थेट प्रवेश मिळावा, यासाठी डिव्हायडर फोडून अनधिकृत रस्ते तयार केले जात असल्याचे दिसून येत आहे. बोरगाव येथील प्रकारामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

डिव्हायडर तोडण्याचे काम सुरू असतानाही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा प्रकारे तयार करण्यात आलेले अनधिकृत कट आणि रस्ते भविष्यात गंभीर अपघातांना कारणीभूत ठरू शकतात. महामार्गावर अनेक ठिकाणी यापूर्वीही अशाच पद्धतीने डिव्हायडर फोडून मार्ग तयार करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT