खटाव : खटाव तालुक्यातील कलेढोण, पाचवड, विखळे, तरसवाडी परिसराला सोमवारी रात्री अवकाळी पावसाने झोडपले. द्राक्ष काढणी आणि गव्हासह इतर पिकांची काढणी सुरु असतानाच पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
खटाव तालुक्यात गेल्या तीन, चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तालुक्याच्या काही भागात काल आणि परवा शेतीचे नुकसान न करणारा किरकोळ स्वरुपातील रिमझिम पाऊस झाला होता. सोमवारी सायंकाळी मात्र कलेढोण परिसरासह विखळे, मुळीकवाडी, गारुडी, तरसवाडी, पाचवड परिसरात अर्धा तास चांगला पाऊस झाला.रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरु होता. अचानक आलेल्या या पावसाने शेतकरी व नागरिकांची तारांबळ उडाली होती. अवकाळी पाऊस नेहमीच नुकसानकारक ठरत आला आहे. सोमवारी रात्री झालेल्या या पावसाने पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती केली.
विखळे परिसरात रात्री आठ वाजल्यापासून पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सध्या द्राक्ष बागांमधील द्राक्षांची काढणी सुरु आहे. अगदी एक्सपोर्ट क्वालिटीचा द्राक्ष माल विक्रीला पाठवला जात असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. पावसामुळे कर्ज काढून वाढवलेल्या द्राक्षबागांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा पिकांचीही काढणी सुरु आहे. काही ठिकाणी ज्वारी, बाजरीची उभी पिके काढणीला आली आहेत. या पिकांचेही पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी पुरते कोलमडून गेले आहेत. राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.