सातारा : गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगररांगांवर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मंगळवारी अक्षरशः रौद्ररूप धारण केले. अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी डोंगर भेगाळून भूस्खलन झाले, तर मोठ-मोठ्या दरडी कोसळल्याने रस्ते बंद पडले. वाई तालुक्यातील जांभळी खोऱ्यात पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला असून परळी खोऱ्यातील आलवडीचा डोंगर भेगाळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जावली तालुक्यात हातगेघर परिसरातही डोंगर खचला आहे. दरम्यान, कृष्णा, कोयना, वेण्णेसह नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून संगम माहुली परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली.
पश्चिमेकडील मुसळधार पाऊस सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्गावरील खिंडवाडी येथे दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील ८३ घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले तर खबरदारीचा उपाय म्हणून ९० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सातारा, महाबळेश्वर, वाई, जावली, कराड आणि पाटण तालुक्यांमध्ये मंगळवारी पावसाने अक्षरशः थैमान घातले. दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरुन वाहू लागले, तर डोंगरकड्यांवरुन दरडी कोसळण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले, पूल पाण्याखाली गेले किंवा वाहून गेले.
अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या. पाटण तालुक्यातील ३९, सातारा तालुक्यातील ९, खंडाळा तालुक्यातील २, जावली तालुक्यातील ११, वाई तालुक्यातील १३, महाबळेश्वर तालुक्यातील ९ अशा ८३ घरांची पडझड झाली आहे. या घरांच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. सातारा तालुक्यातील कारी येथील प्राथमिक शाळेचे पत्रे उडाल्यामुळे तर खंडाळा तालुक्यातील मिरजे येथील शाळा व स्मशानभूमीचे भिंत पडून नुकसान झाले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील नावली येथील ७, धावली येथील १७ आणि रुळे येथील ८ अशा एकूण ३२, जावली तालुक्यातील बहुले येथील २३ आणि बोंडारवाडी येथील ८ अशा ३१, वाई तालुक्यातील जांभळी येथील २२ आणि डोईचीवाडी येथील ५ नागरिकांचे अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, नातेवाईक, मंदिरे आदी सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.
जिल्ह्यात २८८.७ मि.मी. पर्जन्यमान झाले. मंगळवारी सातारा जिल्ह्यात २२ महसूल मंडळांमध्ये ६५ मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान झाले आहे. यामध्ये महाबळेश्वर महसूल मंडळामध्ये सर्वाधिक म्हणजेच ३९२.८ मि.मी. पाऊस झाला. त्या खालोखाल लामज, बामणोली, तापोळा या महसूली मंडळांमध्ये १६९ मि.मी. पाऊस झाला आहे. तर वाठार १४८.५ मि.मी., करहर आणि केळघर या दोन ठिकाणी १२४.५ मि.मी., पाचगणी १३६.५ मि.मी., पसरणी ११०.३ मिमी., पाटण १००.५ मि.मी. पावसाची नाेंद झाली.