सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमीत्त विविध शिवमंदिरात भाविकांनी ‘हर हर महादेव’चा गजर करत दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. विविध शिवमंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवभक्तांच्या गर्दीमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.
रविवारी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शिखर शिंगणापूर, वासोटा येथील नागेश्वर मंदिर, संगम माहुली येथील श्री काशी विश्वेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, बिल्वेश्वर मंदिर, सगुणेश्वर मंदिर, देगाव येथील पाटेश्वर, यवतेश्वर, शुक्रवार पेठेतील कोटेश्वर, योगेश्वर मंदिर, लिंब गोवे येथील कोटेश्वर, फलटण येथील जब्रेश्वर, क्षेत्र महाबळेश्वर, सैदापूर कराड येथील पावकेश्वर, परळी येथील पांडवकालीन शिवमंदिर, गोंदवले बुद्रुक येथील भीमाशंकर, सोळशी येथील श्री हरेश्वर, नरफदेव जावली येथील श्री क्षेत्र मेरुलिंग, कराड येथील कोयनेश्वर, सदाशिवगड येथील शंभूमहादेव, मरडमुरे जावली येथील मरडेश्वर, केळघर येथील काळेश्वर, भाडळी खुर्द येथील ओम संगमेश्वर, बॉम्बे रेस्टारंट येथील नटराज मंदिर यासह गावोगावच्या शिवमंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
ठिकठिकाणच्या मंदिरात पहाटेपासून अभिषेक, पूजा, अर्चा, आरती, महाआरती, प्रवचन, किर्तन, भजन असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी 12 नंतर ठिकठिकाणच्या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत मंदिरात दर्शनासाठी रांगा होत्या. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. विविध आगारातून देगाव, लिंब, क्षेत्रमहाबळेश्वर, शिखर शिंगणापूर, नागेश्वर यासह अन्य मंदिरात भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी जादा एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या. शिवमंदिरात भाविकांच्या गर्दीमुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.