Satara News Pudhari
सातारा

Satara News: साताऱ्यातील राजवाडा भाजी मंडईतील विक्रेत्यांचे गाऱ्हाणे

साताऱ्यातील राजवाडा येथील श्री. छ. प्रतापसिंह महाराज भाजी मंडईतील विविध समस्यांचे गाऱ्हाणे विक्रेत्यांनी नगरपालिका पदाधिकाऱ्यांसमोर शुक्रवारी मांडले.

पुढारी वृत्तसेवा

सातारा : साताऱ्यातील राजवाडा येथील श्री. छ. प्रतापसिंह महाराज भाजी मंडईतील विविध समस्यांचे गाऱ्हाणे विक्रेत्यांनी नगरपालिका पदाधिकाऱ्यांसमोर शुक्रवारी मांडले. यानंतर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत निदर्शनास असलेल्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आल्या.

सातारा शहराच्या पश्चिम भागातील नागरिकांना फळे व भाजीपाला सहज उपलब्ध व्हावा. रस्त्यावरील विक्रेत्यांचीही सोय व्हावी यासाठी श्री. छ. प्रतापसिंह महाराज भाजी मंडईची उभारणी करण्यात आली. सध्या या मंडईतील विक्रेत्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहेत. त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पदाधिकाऱ्यांनी परिसरातील मंडई तसेच शॉपिंग सेंटर तसेच स्व. कस्तुरबा गांधी रूग्णालय परिसराची पाहणी केली. राजवाडा भाजी मंडईचा दुसरा मजला मोकळा आहे. मात्र, पहिल्या मजल्यावर विक्रेत्यांच्या बेशिस्तपणामुळे इतरांची गैरसोय होत आहे. बऱ्याच जणांनी अतिक्रमणे केल्याचे निदर्शनास आले. पार्किंग मुख्य मार्गावर केले जात आहे. तळमजल्यावर पार्किंग करून मंडईच्या दोन्ही बाजूने प्रवेशद्वार केल्यास सर्व वाहन चालकांची सोय होणार आहे.

स्वच्छता गृहाची दुरावस्था झाली आहे. बरेच विक्रेते या फळे व भाजी मार्केटऐवजी रस्त्यावर बसलेले असतात. अशा विक्रेत्यांना मंडईत जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. राजवाड्याजवळील स्व. अभयसिंहराजे भोसले शॉपिंग सेंटरमध्येही विक्रेत्यांना विविध समस्या भेडसावत आहेत. स्व. कस्तुरबा गांधी रूग्णालय परिसरात तळीरामांचा उच्छाद सुरू असून अस्वच्छता पसरल्याचे निदर्शनास आले. संबंधित अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी कार्यवाहीच्या सूचना केल्या. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक राजू गोरे, अभियंता अविनाश शिंदे, दहिफळे, अतिक्रमण विभाग प्रमुख प्रशांत निकम आदि उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT