कराड : कृष्णा आणि कोयना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा तसेच निर्माल्य टाकले जात असल्याबाबत दैनिक ‘पुढारी’ने नुकतीच वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. या वृत्तांनंतर नागरिकांमधून सकारात्मक प्रतिसाद उमटू लागला असून नदी स्वच्छतेसाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, अशा भावना व्यक्त होत आहेत. याच जनजागृतीचा प्रत्यय सोमवारी सकाळी आला.
कराडच्या जुन्या कोयना पुलावरून एक महिला आपल्या दुचाकी वाहनातून प्लास्टिकच्या पिशवीत भरलेला कचरा थेट नदीपात्रात टाकत असल्याचे जागरूक नागरिक क्षितिज सुकरे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कोणताही वाद न घालता शांतपणे संपूर्ण प्रकार पाहिला आणि संबंधित वाहनाचा क्रमांक नोंदवून तो पुढारीच्या प्रतिनिधींना कळविला. सुकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिला दैत्यनिवाणी परिसराच्या दिशेने गेल्याचे समजले. त्यानंतर पुढारीच्या प्रतिनिधींनी त्या परिसरात जाऊन वाहनाचा शोध घेतला असता, संबंधित वाहन तेथे आढळून आले. चौकशी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. हे वाहन एका शासकीय महिला कर्मचाऱ्याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्या पंचायत समितीशी संबंधित कार्यालयात कार्यरत असल्याची माहिती मिळाली. वाहन क्रमांकाच्या आधारे विचारणा केली असता संबंधित महिलेने नदीत कचरा टाकल्याची कबुली दिली. तसेच यापुढे अशी चूक पुन्हा होणार नाही, अशी ग्वाहीही तिने दिली.
नदी स्वच्छतेबाबत समाजाला मार्गदर्शन करण्याची अपेक्षा असलेल्या शासकीय यंत्रणेतील कर्मचारीच नदी प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे. दैनिक ‘पुढारी’च्या प्रतिनिधींनी संबंधित महिलेला भविष्यात नदीत कचरा न टाकण्याचा तसेच अशा प्रकारांना विरोध करण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, कराड नगरपालिकेकडून नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांना देण्यात आली. तसेच या घटनेची माहिती नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनाही देण्यात आली आहे. या घटनेमुळे कराडकर नागरिक आता कृष्णा-कोयना नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध अधिक सजग आणि आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांची जागरूकता आणि कराड नगरपालिकेचे सहकार्य यांची सांगड घातली गेल्यास भविष्यात कृष्णा व कोयना नद्यांमध्ये कचरा टाकण्याच्या घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो, असा विश्वास व्यक्त होत आहे "नदी आपली, जबाबदारीही आपली" हा संदेश आता प्रत्येक कराडकरापर्यंत पोहोचण्याची गरज निर्माण झाली आहे.
कचरा टाकणाऱ्यांवर करडी नजर : साळुंखे
कोयना व कृष्णा नदीत कराड शहरात बाहेरून येणारे नागरिकच कचरा टाकतात. त्यामुळेच पालिका प्रशासनाची संंबंधितांवर करडी नजर असून वेळप्रसंगी कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा कराडचे उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी दिला आहे. कराड शहर देशात स्वच्छतेत प्रथम क्रंमाकावर होते आणि हाच नावलौकिक मिळविण्यासाठी सर्वांना सोबत घेत आम्ही प्रयत्नशील आहोत. स्वच्छ सुंदर कराड हेच आमचे प्रमुख ध्येय असून कराडकर सहकार्य करत आहेत. मात्र शहरात बाहेरून येत कचरा टाकणाऱ्यांनी सहकार्य करावे, अन्यथा नाईलाजास्तव कठोर पावले उचलावी लागणार असल्याचे पोपटराव साळुंखे यांनी सांगितले आहे.