सातारा : सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने समर्थ मंदिर चौकात कारवाई केल्यानंतर संपूर्ण शहरातील अतिक्रमणांना बुलडोझर लावला जाईल, अशी शक्यता होती. मात्र त्यानंतर कारवाई थंडावली. गोडोलीतील अतिक्रमणे हटवली जात असली तरी सातार्यातील महत्त्वाचे चौक, मार्ग तसेच मोक्याच्या भागात अतिक्रमणांनी हात-पाय पसले आहेत. राधिका रोड, पोवईनाका-बसस्थानक-बोस चौक-करंजे नाका-मोळाचा ओढा अतिक्रमणांत गुरफटला आहे. जिल्हा परिषद चौक ते जरंडेश्वर नाका व बॉम्बे रेस्टॉरंट चौकापर्यंत अतिक्रमणे कायम आहेत. राजवाडा परिसरातही अतिक्रमणांनी उच्छाद मांडल्याने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सातारा पालिकेने अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरूवात केली असली तरी मोहिमांना अपेक्षित वेग नसल्याचे दिसते. सध्या गोडोली नाक्यावर कारवाई सुरू असली तरी शहरातील इतर भागातील अतिक्रमणांवरही कारवाई करावी, मागणी आहे. अतिक्रमणांमुळे शहर बकाल दिसत असून टपर्या, खोकी, पान शॉपमधून गैरधंदे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असतानाच ही अतिक्रमणे आता डोकेदुखी ठरू लागली आहेत.
राजवाडा-राजपथ-शाहू चौक ते पोवई नाका फुटपाथवर दिवसेंदिवस टपर्या व खोक्यांची संख्या वाढत आहे. अशीच परिस्थिती मोती चौक-शनिवार चौक-शेटे चौक-मुख्यालय ते पोवई नाका मार्गावर आहे. या मुख्य मार्गावरून फुटणार्या अंतर्गत मार्गावरही अतिक्रमणे वाढू लागली आहेत. पोवईनाका-सभापती निवास-बसस्थानक-नेताजी सुभाषचंद्र बोस चौक-करंजे नाका ते मोळाचा ओढा या मार्गावर टपर्या व खोक्यांची संख्या वाढू लागली आहे. जिल्हा परिषद चौक ते करिअप्पा चौक, जिल्हा परिषद चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात प्रचंड अतिक्रमणे आहेत. याशिवाय सातारा पालिका हद्दीतील वाढे फोटा चौक, अजिंठा चौक, शिवराज पेट्रोल पंप अलिकडील बाजूने अतिक्रमणांचे पेव फुटले आहे. राजवाडा चौकातून जाणार्या अंतर्गत मार्गावरही अतिक्रमणांनी डोके वर काढले आहे.
सातारा पालिकेने समर्थ मंदिर चौकातील अतिक्रमणे काढली असली तरी कारवाई सातत्या ठेवल्यास अतिक्रमणांना आळा बसण्यास मदत होणार आहे. अतिक्रमणांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. अतिक्रमणविरोधी कारवाईचा मोठा ड्राईव्ह घ्यावा, अशी सातारकरांची मागणी आहे.