पाटण : पहिल्या छायाचित्रात ठाकरे गटाकडून काढण्यात आलेला मोर्चा. (छाया सुरेश संकपाळ पाटण) Pudhari
सातारा

Satara News | पालकमंत्री देसाई समर्थक व ठाकरे गट आमनेसामने

पुढारी वृत्तसेवा

पाटण : पाटण विधानसभा मतदारसंघात झालेली कोट्यवधीची कामे निकृष्ट आहेत. टक्केवारी, कमिशन व मलिदा गँगच्या माध्यमातून ठेकेदारांकडून तालुका चालविला जात असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाकडून शुक्रवारी पाटणमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक पालकमंत्री शंभूराज देसाई गटाच्या कार्यकत्यांनीही मोर्चा काढला. मंत्री देसाई समर्थकांनी दर्जेदार कामांची यादी वाचून दाखवित ठाकरे गटाकडून निवडणूक डोळ्यासमोर ठेवत बदनामी केली जात असल्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या दोन्ही परस्परविरोधी मोर्चामुळे पाटण शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

• ठाकरे गटाकडून मंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका

  • ठाकरे गटाकडून लोकांची दिशाभूल करण्यासाठी मोर्चा काढल्याचा दावा

• ठाकरे गटाला मंत्री देसाई गटाकडून जोरदार प्रत्युत्तर

• सुदैवाने टळला अनुचित प्रकार

पालकमंत्र्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न...

मागील दहा वर्षात गावोगावी कोट्यवधी रुपये विकासकामांसाठी देत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला आहे. मात्र विरोधकांकडून निवडणूक डोळ्यासमोर ठेवत लोकांची दिशाभूल करण्यासाठी व मंत्री देसाई यांना बदनाम करण्यासाठी मोर्चा काढला आहे, असा दावा करत देसाई गटाच्या कार्यकत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच विरोधकांना जशास तसे उत्तर देऊ अशा इशारा देत मंत्री देसाई यांची बदनामी खपवून घेणार नाही, असे कार्यकर्त्यांनी निक्षून सांगितले.

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या काळात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासाच्या निकृष्ट कामांची पोलखोल करण्यासाठी पुराव्यासह याची माहिती शासनाला देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पाटण येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी येत असतानाच दबाव तंत्र वापरून हा मोर्चा मोडीत काढण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केल्याने केल्याचा आरोप करत हर्षद कदम व ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी करत मंत्री शंभूराज देसाई यांचा निषेध नोंदविला. त्याला मंत्री देसाई समर्थकांनी जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांकडून दिशाभूल केली जात असल्याचा दावा करण्यात आला.

पाटण शहरात हे दोन्ही मोर्चे नवीन स्टॅन्ड परिसरात समोरासमोर आल्यानंतर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा ठाकरे गटाने दिल्या. तर मंत्री शंभूराज देसाई जिंदाबाद अशा घोषणा देसाई गटाकडून देण्यात आल्या. याच दरम्यान प्रचंड तणाव लक्षात घेता पोलिसांनी कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्ग काही काळ बंद ठेवून पोलीस वाहनांच्या मदतीने हे दोन्ही मोर्चे रोखण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील कार्यकत्यांनी याला छेद देत रस्त्यावर आपआपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. देसाई गटाचा मोर्चा काही काळानंतर शांत झाला. त्यानंतर झेंडा चौक येथे ठाकरे गटाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यानंतर हा मोर्चा लायब्ररी चौक येथे आल्यावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले.

हर्षद कदम यांनी आज दडपशाही, हुकूमशाही सुरू असल्याचे सांगत मंत्री देसाई यांच्यावर टीका केली. यावेळी तालुकाप्रमुख सुरेश पाटील, रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस उपअधीक्षक विजय पाटील, पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक व राज्य राखीव पोलीस यंत्रणा सक्रिय होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT