सातारा : सातारा जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या सार्वजनिक बांधकाम ‘पूर्व’ व ‘पश्चिम’ या दोन्ही विभागाच्यावतीने जिल्ह्यात 46 हजार 57 झाडे लावण्यात आली आहेत. या वृक्षलागवडीत शेकडो कर्मचारी सहभागी झाले आहेत. गेल्या आठवड्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानामुळे सातारा जिल्ह्यात जणू ‘ग्रीन मिशन’ सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळाच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्ह्यात वृक्ष लागवड अभियान राबवण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात या मंडळाने वेल्हे-शिक्रापूर-जेजुरी-लोणंद-सातारा या राज्य मार्गावर पोवई नाका ते वाढे फाटा यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा 1 हजार 514 झाडांची लागवड केली. यामध्ये प्रामुख्याने बहावा, कदंब, अर्जुन, पुत्रवती, कांचन, बकूळ, पुत्राजिवा, कडूनिंब, कुंकू, मोहगणी, खडशिंग, करंज यासारख्या औषधी व सेंद्रिय उपयोगी वृक्षांचा समावेश आहे. या झाडांची उंची 8 ते 10 फूट इतकी असून 330 एक्झोरा व पावडर पफसारख्या आकर्षक सजावटीच्या झाडांचाही समावेश आहे.
या वृक्षलागवड मोहिमेमुळे सातारा जिल्ह्याचा पर्यावरणाचा समतोल सुधारण्यास मदत होणार आहे. हे अभियान म्हणजे ‘हरित सातारा, स्वच्छ सातारा’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याच्यादृष्टीने हे एक मोठं पाऊल ठरणार आहे. या अभियानात सेवाभावी संस्था, पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी सहभागी झाले आहेत. सातारा शहरातील ही मोहिम सार्वजनिक बांधकाम मंडळाने अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात नेली आहे. या मंडळाचे कार्यकारी अभियंता (पूर्व) श्रीपाद जाधव व कार्यकारी अभियंता (पश्चिम) राहूल अहिरे यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील 11 तालुक्यात 46 हजार 57 झाडे लावण्यात आली आहेत. ही वृक्ष लागवड सार्वजनिक बांधकाम मंडळाकडे असलेल्या दोन्ही विभागांकडील 114 रस्ते तसेच 35 इमारतींच्या परिसरात करण्यात आली आहे.