उकाड्यामुळे नदी, विहिरींवर पोहण्यासाठी मुलांची गर्दी 
सातारा

Satara News : उकाड्यामुळे नदी, विहिरींवर पोहण्यासाठी मुलांची गर्दी

पालकांनी सतर्क राहण्याची गरज ; सुरक्षा उपयांची अंमलबजावणी आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

मारूल हवेली : निसरे (ता. पाटण) येथे नदीत पोहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून उन्हाळी सुट्टीत नदी, तलाव आणि विहिरींवर वाढणाऱ्या मुलांच्या गर्दीबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्यानंतर ग्रामीण भागातील मुले खेळ, फिरणे आणि पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे अनेक मुलांचा ओढा नदी, तलाव आणि विहिरींकडे वाढला आहे. अनेकदा पालकांच्या नकळत मुले पोहण्यासाठी जात असल्याने दुर्घटनेचा धोका वाढत आहे. विशेषतः पोहण्याचे पुरेसे कौशल्य नसलेल्या मुलांसाठी अशा ठिकाणी जीवितहानीची शक्यता अधिक असते.

दरवर्षी राज्यातील विविध भागांत नदी, तलाव किंवा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर येतात. तरीही अनेक ठिकाणी सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. निसरे येथील नारळवाडी परिसरातील समर्थ दिपक चव्हाण या १२ वर्षीय मुलाचा नुकताच नदीत बुडून मृत्यू झाला. यापूर्वीही पाच वर्षांपूर्वी याच परिसरात विश्वजीत विकास पंडित या मुलाचा बुडून मृत्यू झाला होता.

निसरे परिसरात फरशी पूल आणि बंधारा असल्यामुळे नदीपात्रात पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुलांची गर्दी होत असते. मात्र अनेक मुले कोणत्याही सुरक्षाव्यवस्थेशिवाय किंवा मोठ्यांच्या देखरेखीशिवाय पाण्यात उतरतात. त्यामुळे अशा ठिकाणी अपघाताचा धोका कायम असतो. मुलांना पोहण्यासाठी धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखणे, त्यांच्यावर नियमित लक्ष ठेवणे आणि पाण्याजवळ सुरक्षेचे नियम पाळण्याबाबत जागरूक करणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा निष्काळजीपणाची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT