Satara News: मतदानापूर्वीच पाल परिसरात राडा Pudhari Photo
सातारा

Satara News: मतदानापूर्वीच पाल परिसरात राडा

भाजप - राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; मारामारीनंतर परस्परविरोधी तक्रार

पुढारी वृत्तसेवा

कराड : जिल्हा परिषद - पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान होत असतानाच शुक्रवारी मतदानापूर्वीच पाल जिल्हा परिषद गटात भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. जंगलवाडी - साखरवाडी मार्गावरील या धुमश्चक्रीनंतर उंब्रज पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या घटनेनंतर पाल गटात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

बाळासाहेब वसंतराव साळुंखे (वय 58, रा. चोरे) आणि विश्वासराव निवृत्ती काळभोर (वय 53, रा. पाल) या दोघांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. साळुंखे हे राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे समर्थक आहेत. विश्वासराव काळभोर यांचे बंधू भाजपमधून जिल्हा परिषद निवडणूक लढवित आहेत. शुक्रवारी सकाळी बाळासाहेब साळुंखे हे पाल परिसरातील जंगलवाडीत होणाऱ्या पारायणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी गेले होते. तेथून ते परतत असताना जंगलवाडी - साखरवाडी मार्गावरील भैरवनाथ मंदिर परिसरात उभे राहिले होते. त्याचवेळी साखरवाडीकडून विश्वासराव काळभोर आपल्या साथीदारांसोबत या ठिकाणी येत आपणास मारहाण केली. यावेळी या ठिकाणी कशाला आला ? यायचे नाही असे सांगितले होते ना ? असे म्हणत आपणास मारहाण करण्यात आली.

तसेच दोन ते तीन दिवसापूर्वी आपणास दमबाजी करण्यात आली होती आणि त्यावेळी यात पडू नका, महागात जाईल असा इशाराही विश्वासराव काळभोर यांनी दिल्याचा दावा करणारी साळुंखे यांची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे. तर दुसरीकडे विश्वासराव काळभोर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय वादातून बाळासाहेब साळुंखे यांनी आपणास अपशब्द वापरले आणि त्यामुळेच हा वाद झाल्याचा दावा केला आहे. अपशब्द वापरल्याने वाद होऊन साळुंखे यांनी आपणास मारहाण केल्याचे म्हणणे काळभोर यांनी तक्रारीद्वारे मांडले आहे. बाळासाहेब साळुंखे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते असून यापूर्वी त्यांच्या वहिनी जयश्री साळुंखे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले आहे. तर विश्वासराव साळुंखे यांचे बंधू भाजप उमेदवार माधवराव काळभोर हे राष्ट्रवादीचे उमेदवार माजी सभापती देवराज पाटील यांच्या विरोधात पाल जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवित आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT