सातारा

पोवई नाका सोडून दुसरीकडे स्मारक बांधा : आ. शिवेंद्रराजे

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  पोवई नाक्याच्या संपूर्ण परिसराला सातारकर शिवतीर्थ म्हणून ओळखत आहेत. त्यामुळे या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज (थोरले) या व्यतिरिक्त कोणतीही तडजोड सातारकर स्वीकारणार नाहीत. त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी समंजस्यपणा दाखवून स्व. बाळासाहेब देसाई यांचे स्मारक पोवई नाका सोडून इतर ठिकाणी बांधावे, अशी कडक भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत घेतली. अहंकाराचे हे इगो वॉर तातडीने थांबवा, असा सल्लाही आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला.

पोवई नाका येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे आयलँड उभारण्यावरून सातार्‍यात गेल्या चार दिवसांपासून वादंग सुरू आहे. राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले , खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कृतीला विरोध दर्शवला आहे, तर सातार्‍यातील सामाजिक संघटनांनीही तीव्र निदर्शने केली आहेत.

शुक्रवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर पत्रकार परिषदेत 'पालकमंत्री म्हणून माझ्या अधिकारात मी पोवई नाक्यावरच मोकळ्या जागेत स्व. बाळासाहेब देसाई यांचे आयलँड उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. मी आयलँड इथेच बांधणार, कुणी कितीही विरोध करा खपवून घेणार नाही, अशी भूमिका जाहीरपणे बोलून दाखवली. पालकमंत्र्यांच्या भाषेवर सोशल मीडियावर जोरदार टिकाटिप्पण्णी सुरू आहे. गेले चार दिवस या वादापासून दूर असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्यातील आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शनिवारी प्रथमच आक्रमक व उघड भूमिका घेतली.

आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सातार्‍यात गोंधळ नव्हे तर इगो वॉर सुरू आहे. त्याला आपण अहंकार म्हणतो. एकाने भिंतीवर चित्र रंगवले, तर दुसर्‍याने स्मारक करायचे ठरवले आहे. हे इगो वॉर आहे. दुर्दैवाने सातारकर आणि शिवभक्त या दोन नेत्यांमध्ये अडकले व गुरफटले गेले आहेत. या विषयात वेगळे काहीही नाही. स्थानिक दोन नेत्यांच्या इगो वॉरचा फटका हा सातार्‍याला बसत आहे. मध्यंतरी पेंटिंगवरून उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांच्यात वाद सुरू होता. उदयनराजे यांचे पेंटिंग काढायचे मध्येच थांबवले, पेंटरला पकडले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्याबाबत कसलीही तडजोड
होऊ शकणार नाही आणि कोणी करणारही नाही. इगो वॉर खासदार आणि पालकमंत्री या दोघांनीही थांबवावे. पालकमंत्र्यांनी समंजस्यपणा दाखवावा. उदयनराजे स्वतः समंजस्यपणाची भूमिका घेतील असे नाही. ते त्यांच्याच विश्वात सारखे असतात. त्यामुळे पालकमंत्र्यांनी समंजस्यपणा दाखवावा आणि शिवतीर्थ परिसराबाबत शिवभक्तांच्या भावनांचा मान ठेवावा, असे आवाहनही आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे.

बाळासाहेब देसाई हे सातारा जिल्ह्याचे फार मोठे नेतृत्व होते. त्यांच्याबाबत सर्वांनाच आदर आहे. बाळासाहेब देसाईंचे स्मारक त्यांना सातार्‍यात करायचे असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थ परिसरात न करता अन्य बरीच ठिकाणे असून लोकांना दिसेल अशा ठिकाणी उभे करावे. पहिले आपण पोवई नाका म्हणत होतो, त्यानंतर कालांतराने शिवभक्तांमुळे शिवतीर्थ नाव पडले. लोकांच्या भावनांचा आदर ठेवला पाहिजे. आपण लोकप्रतिनिधी आहोत, असा टोलाही आ. शिवेंद्रराजेंनी लगावला.

संपूर्ण पोवई नाका परिसरच 'शिवतीर्थ'

शिवतीर्थ म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेला परिसर असे नव्हे, तर संपूर्ण पोवई नाका परिसरच शिवतीर्थ आहे. लोकांच्या तशा भावना आहेत, हे पालकमंत्र्यांनी लक्षात घेतले पाहिजे. आताची तरुण पिढी हा संपूर्ण परिसर शिवतीर्थ म्हणून ओळखत आहे. शंभूराज यांनीच समंजस्यपणा दाखवून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारक इतर ठिकाणी बांधावे. लोकांच्या भावना आहेत त्याप्रमाणे माझी पण अपेक्षा असून पालकमंत्री नक्की विचार करतील, असे आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.

SCROLL FOR NEXT