सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाने वळण बंधाऱ्याचा सातारा पॅटर्न हा नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे 134 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. जिल्ह्यातील पश्चिमेकडील सातारा, जावली व पाटण तालुक्यातील भौगोलीक क्षेत्र डोंगरी असल्याने या ठिकाणी जास्तीत जास्त पर्जन्यमान होत असले तरी तीव्र उतारामुळे पाणीसाठा होत नाही. यासाठी वळण बंधाऱ्यातून डोंगरी भागातील क्षेत्र ओलिताखाली आले आहे. त्यातून सुमारे 588 शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर डोंगर रांगा आहेत. पावसाळ्यात या भागामध्ये सर्वच ओढ्या नाल्यांना मूबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असते. हे पाणी वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून वळवून पाटाद्वारे अथवा पाईपलाईनद्वारे भात शेतीस दिल्यास त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील बहुतांशी ओढे हे आठमाही अथवा दहामाही प्रवाहीत असतात. या ओढ्यातील पाणी वळण बंधारे, पाट, पाईपलाईनद्वारे रब्बी हंगामातील गहू, मका व हरभरा या पिकांच्या सिंचनासाठी उपलब्ध होत आहे.
वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून विजेचा कोणत्याही प्रकारे वापर न करता शेतीला विनामूल्य पाणी पोहोचवता येते. त्यातून शेतकऱ्यांच्या पैशाची बचत होते. तसेच वेळेवर सिंचन उपलब्ध झाल्याने शेती उत्पन्नात देखील वाढ होवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. वळण बंधाऱ्यामुळे सातारा, जावली व पाटण तालुक्यातील डोंगरी भागातील 134 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. त्याचा या तालुक्यामधील विविध गावातील 588 शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सरासरी 30 टक्के वाढ झाली असल्याची माहिती जिल्हा संधारण अधिकारी अरुणकुमार दिलपाक यांनी दिली.
लघू पाटबंधारे विभागामार्फत सातारा, जावली व पाटण तालुक्यातील डोंगरी भागात सुमारे 35 नवीन बंधाऱ्यांची कामेही पूर्ण झाली आहेत. या बंधाऱ्यामुळे आजूबाजूच्या विहिरीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच शेतीसाठीही या बंधाऱ्याचा फायदा होणार आहे.
सातारा, जावली व पाटण तालुक्यातील भौगोलीक क्षेत्र डोंगरी असल्याने या ठिकाणी पाऊस जास्त होत असला तरी पाणीसाठी होत नाही. त्यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून वळण बंधाऱ्यातून डोंगरी भागातील क्षेत्र ओलिताखाली आले आहे. त्यातून सुमारे 588 शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.-याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा