सातारा : सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेने वेगाने हालचाली करून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबतची पहिली प्राथमिक बैठक एका हॉटेलमध्ये मंगळवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत निवडणुकीपूर्वी व निवडणुकीत भाजपने महायुतीचा धर्म न पाळता मतदारसंघांमध्ये केलेल्या हस्तक्षेपांमुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. राष्ट्रवादीचे मंत्री मकरंदआबा पाटील, खा. नितीनकाका पाटील, संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा झाल्याचे समजते.
जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये एकहाती सत्ता आणण्याचे भाजपसह राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांचे स्वप्न अखेर भंगले. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी सत्तेचा दावा केलेल्या पक्षांकडे 33 सदस्यांची गरज आहे. बहुमतासाठी लागणारी ही मॅजिक फिगर जुळवून सत्ता सोपान गाठण्यासाठी जिल्ह्यातील मतदारांनी टाकलेले अवघड गणित आता तिन्ही पक्षांच्या नेतेमंडळींना सोडवावे लागणार आहे.जिल्हा परिषदेच्या 65 जागांपैकी भाजपकडे 27, राष्ट्रवादी व स्वाभिमानी मिळून 21, तर शिवसेनेकडे 15 सदस्य संख्या आहे. त्यामुळे या प्रमुख पक्षांकडे बहुमताचा आकडा नाही. या परिस्थितीत इतर पक्षांसमवेत वाटाघाटी करून सत्ता मिळवावी लागणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी एकत्रित येत निवडणूक लढली होती. पाटण व फलटण या दोन तालुक्यांमध्ये शिवसेनेला मोठे यश मिळाले, तिथेच राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत वाटाघाटी केल्या होत्या.
भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, विधानसभेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, खा. नितीनकाका पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एकत्रितपणे फासे टाकत भाजपला शह दिला. भाजपच्या हक्काच्या जागांवर राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांनी शिरकाव करत भाजपचे उमेदवार पाडून आपले उमेदवार निवडून आणले.
सत्ता स्थापनेबाबत साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये पालकमंत्री व शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई, राष्ट्रवादी नेते व मदत, पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील, खा. नितीन पाटील, संजीवराजे ना. निंबाळकर यांच्यात बैठक झाली. या बैठकीत सत्ता स्थापनेसाठी एकत्र येण्याचा निर्णय झाला. त्यानुसार लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याबाबत पावले उचलण्यात आली. निवडणुकीपूर्वीच भाजपला महायुतीत येण्याचे सुचवूनही त्यांनी स्वबळाचा नारा दिला. निवडणुकीतही राष्ट्रवादी व सेनेच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात त्यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपबरोबर आता युती नको या मतावर ठाम असल्याने निवडणुकीपूर्वी जसे आपण एकत्र राहिलो तसेच आपण एकत्र राहून सत्ता स्थापन करू, अशी चर्चा बैठकीत झाली. बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांच्या कालावधींबाबतही चर्चा झाल्याचे समजते. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आता तुटू द्यायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला. याबाबत वरिष्ठांशीही चर्चा करून निर्णयाला अंतिम स्वरूप देण्याचे ठरले.
दरम्यान, मंगळवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे जिल्हा परिषदेच्या निकालानंतर लातूरला तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सोलापूरला गेले. तिथे त्यांनी भाजपच्या नवनियुक्त सदस्यांचा सत्कार केला. आता ते साताऱ्यात परतल्यानंतर भाजपमधून जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेबाबत हालचाली होतील, अशी शक्यता आहे.