सातारा

सातारा : पतीचा खून; पत्नीसह प्रियकराला जन्मठेप

दिनेश चोरगे

सिध्देश्वर कुरोली; पुढारी वृत्तसेवा :  अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढणार्‍या खटाव तालुक्यातील पत्नी आणि तिच्या प्रियकराला वडूज जिल्हा न्यायलायाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पत्नी स्वाती ब्रह्मदेव तुपे (वय 31, रा. तुपेवाडी) व प्रियकर धनाजी शिवाजी काटकर (रा. मानेवाडी ता. खटाव) अशी शिक्षा लागलेल्या आरोपींची नावे आहेत. ब्रम्हदेव तुपे असे खून झालेल्या पतीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, स्वाती तुपे व धनाजी काटकर यांच्यात प्रेमसंबंध होते. धनाजी वेळोवेळी स्वातीच्या घरी जात होता. स्वातीच्या पतीसह कुटुंबियांनी तिला समजही दिली होती. मात्र त्यांचे भेटणे सुरुच होते. समज दिल्यानंतरही पती ब्रहमदेव यांना 'तुझ्यावर खोटी केस करण्याची धमकी दिली जात होती.' अनेकदा तिघांमध्ये यातून वादावादी झाली होती. दि. 3 जून 2016 रोजी सायंकाळी धनाजी हा स्वाती हिला भेटावयास घरी आला होता. त्यावेळी पती ब्रह्मदेव त्यांच्या शेजारी राहणार्‍यांसोबत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी अचानक गारांचा जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सर्वजण आपापल्या घरी गेले. ब्रम्हदेव, स्वाती व धनाजी हे तिघे ब्रम्हदेव यांच्या घरात होते. त्यावेळी स्वातीने दारास कडी लावून घेतली. त्यांनतर 15 मिनिटांनी स्वाती व धनाजी काटकर हे घराबाहेर येवून आरडाओरडा करून ब्रहमदेव याने गळफास घेवून आत्महत्या केली असा बनाव केला. वडूज पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. खूनाची घटना असल्याने त्या अन्वये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली.

टेलिफोन वायरने गळा आवळून खून केलेबाबत तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली. या गुन्हयाचा तपास करुन फौजदार पी. एम. जाधव यांनी वडूज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्यावतीने सहायक जिल्हा सरकारी वकील ए. पी. कदम-साबळे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्यावतीने एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकील यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. प्रॉसिक्युशन स्क्वॉड वडूजचे अंमलदार सागर सजगणे, दत्तात्रय जाधव, दडस, जयवंत शिंदे, अमीर शिकलगार यांनी सहकार्य केले.

SCROLL FOR NEXT