सातारा : पळून जाऊन लग्न करायला नकार दिल्यानेच शिवथर येथील विवाहित महिलेचा निर्घृण खून करून काटा काढल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या खुनाचा पोलिसांनी अवघ्या 12 तासांत भांडाफोड करताना संशयिताला स्वारगेट, पुणे येथून मध्यरात्री अटक करण्यात आली. अक्षय रामचंद्र साबळे (वय 28, रा. शिवथर) असे संशयिताचे नाव असून, त्याने याबाबतची कबुली दिली आहे.
सोमवारी पूजा प्रथमेश जाधव (वय 27, रा. शिवथर) या विवाहित महिलेचा धारदार शस्त्राने गळा चिरुन खून झाला. पूजाचे सासू-सासरे शेतामध्ये कामासाठी गेले होते. पती प्रथमेश हे लहान मुलाला शाळेमध्ये सोडून कामाला निघून गेले होते. याचाच गैरफायदा घेऊन अक्षयने दुपारी घरामध्ये कोणी नसताना पूजाचा खून केला. सातारा तालुका पोलिसांची तीन पथके तपासासाठी तयार करण्यात आली होती.
पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर तपासामध्ये अक्षय साबळे या संशयिताचे नाव समोर आले. पोलिसांनी तांत्रिक माहिती घेतल्यानंतर तो पुणे येथे असल्याचे समोर आले. त्यामुळे घटना घडल्यानंतर अवघ्या 8 तासात त्याला पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतले. पोलिसांना त्याने खून केल्याची कबुली दिली आहे. अक्षय साबळे संबंधित विवाहितेच्या मागे पळून जाण्यासाठी सातत्याने दबाव टाकत होता. पण विवाहितेने त्याला नकार देत होती. त्यामुळे अक्षय साबळे याने घरात घुसून पूजा जाधव हिचा कटरच्या साह्याने गळा चिरुन खून केला आणि तेथून पसार झाला.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक राजीव नवले पोनि निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद नेवसे, अनिल मोरडे, फौजदार अभिजीत गुरव, सोनू शिंदे, पोलिस दादा स्वामी, पंकज ढाणे, राजू शिखरे, मालोजी चव्हाण, मनोज गायकवाड, राहूल राऊत, सचिन पिसाळ, सतीश बाबर, प्रदीप बाबर, सुनील भोसले, संदीप पांडव यांनी कारवाईत सहभाग घेतला.
गेल्या काही वर्षांपासून पूजा जाधव हिच्या संपर्कात अक्षय साबळे होता. यातून त्यांचे अनैतिक संबंध निर्माण झाले होेते. यामुळे अक्षय तिला वारंवार पळून जाऊन लग्न करण्याचा तगादा लावत होता. मात्र, पूजा तयार होत नव्हती. यातून दोघांची भांडणेही झाली होती. पूजा फसवत असल्याने अक्षय याने तिचा खून केला.- पोनि नीलेश तांबे, सातारा तालुका पोलिस ठाणे