सातारा : साताऱ्यातील राजवाडा परिसरातील तांदूळ आळी येथील पूज्य कस्तुरबा रुग्णालयाची जुनी व धोकादायक झालेली इमारत अवैध धंद्यांचे केंद्र बनली होती. महिला, मुलींना रस्त्यावरुन जातानाही त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या प्रचंड तक्रारी वाढल्याने सातारा पालिका पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. रुग्णालयासाठी नवी इमारत बांधून पूर्ण झाल्याने वापरात नसलेली जुनी इमारत सोमवारी पाडण्यात आली. त्यामुळे सोमवार पेठ, तांदूळ आळी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून संबंधितजागेचा लोकहितासाठी वापर करावा, अशी मागणी होत आहे.
सातारा पालिकेच्या मालकीचे असलेल्या पूज्य कस्तुरबा रुग्णालयाच्या इमारतीत साताऱ्यातील अनेक पिढ्यांचा जन्म झाला. या ठिकाणी रुग्णालयाची आधुनिक इमारत सातारा पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. मात्र जीर्ण झालेल्या जुन्या इमारतीची प्रचंड दुरावस्था झाली होती. वापरात नसलेल्या या इमारतीत मद्यपींचा अड्डा तयार झाला होता. तसेच मटका व जुगाराचे अवैध प्रकारही सुरु झाल्याने परिसरातील महिला व मुलींची कुचंबना होत असल्याने परिसरातील नागरिकांच्या प्रचंड तक्रारी वाढल्या होत्या.
दरम्यान, सातारा पालिकेने याच परिसरात सातारकरांसाठी आधुनिक सुविधांची सुसज्ज रुग्णालयाची नवीन इमारत यापूर्वीच उभारली आहे. मात्र, लगतच असलेल्या जुन्या इमारतीमुळे रुग्णालयाच्या परिसराची सुरक्षितता आणि स्वच्छतेवर परिणाम होत होता. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत सातारा पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. त्यानंतर संबंधित इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर ही कारवाई पूर्ण झाल्याने परिसरातील अवैध धंद्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे. सातारा पालिकेच्या कार्यवाहीमुळे परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून नागरिकांनी पालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.