सातारा : सातारा पालिकेची निवडणूक होऊन लोकनियुक्त नगरसेवक पालिकेत आलेल्यास तब्बल सात महिन्यांचा कालावधी उलटत आला. मात्र, या काळात सातारा पालिकेच्या तिजोरित सरकारचा कसलाही निधी आला नाही. सर्वसाधारण सभांमध्ये राडे, कळवंडी, बहिष्कार, एकमेकांच्या उकाळ्यापाकाळ्या या पलिकडे काहीही घडले नाही. शेकडो विकासकामांचे प्रस्ताव मंजूर.. मंजूरच्या घोषात मान्य केले गेले. मात्र, निधीच नसल्याने सातार्याच्या विकासाचा गाडा पूर्णपणे ठप्प झाला आहे. सातारा पालिकेत नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल सातारकर करत आहेत.
गेल्या सात महिन्यांत सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये विकासकामांचे शेकडो प्रस्ताव मंजूर करण्यात आले. प्रस्ताव मंजूर करणे म्हणजे केवळ कागदी घोडे नाचवणे ठरले आहे. या कामांसाठी निधीच उपलब्ध नाही. राज्य शासनाकडून एक पैसाही न आल्याने मंजूर प्रस्ताव फाईलींमध्येच धूळखात पडले आहेत. विकासकामांच्या घोषणा करायच्या, सभेत टाळ्या पिटायच्या, सभेत लंबीचौडी भाषणे ठोकायची, जोरजोरात बाके बडवायची आणि निधीसाठी कोणतेही प्रयत्न न करता स्वस्थ बसायचे, असाच कारभार सात महिन्यांत दिसून आला. नवी कामे दूरच पण जुनीच कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत.
अपूर्ण कामांचा बॅकलॉगच इतका मोठा आहे की, त्याचा थेट परिणाम नव्या विकासकामांवर होत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती अशा मुलभूत नागरी सुविधांच्या कामांना म्हणावी तशी गती नाही. नागरिकांना सुविधा मिळत नाहीत आणि नगरसेवक मात्र सभागृहात एकमेकांशी भांडण्यात, उणीदुणी काढण्यात, अपमान करण्यात, गेमा खेळण्यात, जिरवाजिरवी करण्यात वेळ दौडत असल्याचे चित्र निराशाजनक आहे.
नगरसेवक निवडून आल्यानंतर विकासात्मक कामकाज सुरू होणे अपेक्षित असताना राज्य शासनाकडून निधीच प्राप्त न होणे हे मोठे अपयश आहे. नगरसेवकांनी शासन दरबारी पाठपुरावा करून निधी आणणे अपेक्षित असते. मात्र, सातारा पालिकेतील नगरसेवक निधी आणण्यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत नाहीत.