सातारा : पालिकेच्या गुरुवारी झालेल्या सभेत नगरसेवकांमध्ये खटके उडाले. खा. उदयनराजे व ना. शिवेंद्रराजे गटातील नगरसेवक आमने-सामने आले. नगरसेवकांना सभेपूर्वी मुदतीत नोटीस दिली जात नाही. खुल्या जागा ताब्यात नसतानाही त्यावर निधी टाकला जात आहे. प्रस्तावांमध्ये गंभीर त्रुटी असतानाही ते मंजुरीसाठी आणले जात असल्याचे सांगत नगरसेवक शंकर माळवदे यांनीही विरोध केला.
यावेळी माळवदे आणि अविनाश कदम, फिरोज पठाण यांच्यात जुंपली. बीपीसीएलला गॅस पाईपलाईन खोदकामासाठी दिलेल्या परवानगीत पालिकेचे नुकसान झाल्याचे सांगत नगरसेवकांनी सीओंना धारेवर धरले.
पालिकेची सर्वसाधारण सभा श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी झाली. ऐनवेळच्या विषयांवरून सभा चांगलीच तापली. शंकर माळवदे म्हणाले, सर्वसाधारण सभेची नोटीस ७ दिवस अगोदर मिळाली नाही. याप्रकरणी सीओंकडे तक्रार केली. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे मागील सभेवेळी घेतलेले सर्व ठराव रद्द करावेत, प्रोसेडिंगमध्ये दुरुस्ती करावी, अशी मागणी केल्याने तणाव निर्माण झाला. माळवदे तसेच गटनेते अविनाश कदम, नगरसेवक फिरोज पठाण यांच्यात तूतू-मैमै झाले.
माळवदे म्हणाले, अभियंत्यांची प्रतिनियुक्ती करण्यापूर्वी त्याअनुषंगाने आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी आवश्यक आहे. सदर बझारमधील सोसायटीच्या खुल्या जागेत काम होत आहे. जागा नगरपालिकेची नसतानाही खर्च केला. संबंधित जागा लहान मुलांचे खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहे. अशा विषयांना समर्थन राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
निशांत पाटील म्हणाले, संबंधित कामासाठी निवडणुकीपूर्वी कार्यारंभ आदेश दिले आहेत. नागरिकांनी बगीचा करण्याची मागणी केली. त्यानुसार बरेच काम पूर्ण झाले आहे. तांत्रिक बाबी उपस्थित करून फाटे फोडले जात आहेत. कुणाला काय करायचे आहे ते करावे, असा इशारा त्यांनी दिला.
नगरसेवक फिरोज पठाण म्हणाले, विलासपूरमध्ये बिअर बारला महिलांचा विरोध आहे. पालिकेच्या परवानगीशिवाय दारू दुकानास परवानगी देऊ नये. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
सभापती बाळू खंदारे म्हणाले, मुख्याधिकार्यांनी बीपीसीएलकडून डीएसआरप्रकरणे आकारणी न करता खोदकाम करण्यास परवानगी दिली. त्यामुळे नगरपालिकेचे नुकसान झाले आहे. याबाबत पदाधिकारी, नगसेवकांना विचारात घेतले गेले नाही. माझे आरोप खोटे असतील तर सभापतिपदाचा राजीनामा देतो. सीओ चुकले असतील तर त्यांच्यासह अंदाजपत्रक बनवणार्या अभियंत्यांना निलंबित करा, अशी मागणी केली.
मुख्याधिकारी विनोद जळक म्हणाले की, शासन निर्णयानुसार २४ तासांत खोदकाम परवानगी देणे आवश्यक होते. मंत्रालय व जिल्हास्तरावरील अधिकार्यांच्या बैठकीतील सूचनांनुसार पुढील कार्यवाही केली. खोदकाम जादा केले असल्यास त्यांच्याकडून वाढीव रक्कम वसूल करणार असल्याचाही निर्णय त्यावेळी झाला. याप्रकरणी समिती नेमून चौकशी करावी. कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे.
गटनेते अविनाश कदम म्हणाले, बीपीसीएलकडून होणार्या खोदकामाचे पैसे येत नाहीत तोपर्यंत काम थांबवावे. चुकीचे काम करू नये.
माळवदे म्हणाले, पालिकेच्या महादरे तलाव येथील परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होणार असला, तरी याप्रकरणी २५ एकर क्षेत्रानुसार विकास आराखडा तयार केला. वास्तविक, हे क्षेत्र १५ एकर आहे. नेत्यांना खूश करण्यासाठी केलेला हा कारभार आहे.
काही क्षेत्र वर्ग २ चे असल्याने या प्रस्तावातील गंभीर त्रुटी दूर कराव्यात. सीओंना बांधण्यात येणारे निवासस्थान जागा सबर्बन म्युनिसिपल कौन्सिलच्या नावावर आहे. प्रशासनाने कागदी घोडे नाचवू नयेत, असे त्यांनी सांगितले. यावेळीही शाब्दिक चकमक झाली.