Satara Municipal Council Pudhari
सातारा

Satara Municipal Council: सातारा पालिकेच्या देदीप्यमान कामगिरीचा मुंबईत सन्मान

माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम आल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते गौरव

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या माझी वसुंधरा 5.0 अभियानात सातारा नगरपालिकेने 1 ते 3 लाख लोकसंख्या गटात संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश मिळवले आहे. मुंबईतील वरळी येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात साताऱ्याच्या या देदीप्यमान कामगिरीचा पारितोषिक देवून गौरव करण्यात आला. या यशाबद्दल खा. छ. उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा पालिकेचे अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे शनिवारी हा शानदार पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते हा बहुमान सातारा पालिकेला प्रदान करण्यात आला. सातारा नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक राजू गोरे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, दिलीप चिद्रे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सातारा नगरपालिकेने या अभियानांतर्गत पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उच्चतम कामगिरी नोंदवली. पालिकेने प्रामुख्याने रेन वॉटर हार्वेस्टिंग (जल पुनर्भरण), शहरातील स्वच्छता मोहीम, दर्जेदार आरोग्यसेवा आणि अपारंपरिक ऊर्जा साधनांचा (सौर ऊर्जा) प्रभावी वापर यावर विशेष भर दिला. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि मोठ्या प्रमाणावरील वृक्षारोपण यामुळे साताऱ्याने पुणे विभागात आणि पर्यायाने संपूर्ण राज्यात अव्वल स्थान मिळवले. प्रशासकीय नियोजन आणि सातारकरांच्या उत्स्फूर्त लोकसहभागामुळेच हे यश साध्य झाले आहे. यापूर्वीही पालिकेने माझी वसुंधरा योजनेसह शासनाच्या विविध उपक्रमात सहभाग घेऊन उच्चतम कामगिरी नोंदवताना विविध पुरस्कारांवरही आपले नाव कोरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT