महाबळेश्वर : महाबळेश्वर नगरपालिकेने प्रशासकीय काळात शहरातील पाच प्रमुख ठिकाणी नागरिकांसाठी माहिती व जाहिरात प्रसिद्धीच्या उद्देशाने लाखो रुपये खर्च करून डिजिटल स्क्रीन बसवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या योजनेतील एक डिजिटल स्क्रीन आज वर्षभरापासून द क्लब मैदानात उघड्यावर पडून धूळ खात आहे. यामुळे लाखो रूपये वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यानिमित्त प्रशासकीय काळातील आणखी एका अनागोंदी कारभाराचे उदाहरण समोर आले आहे.
पालिकेचा महसूल वाढवण्याच्या तथाकथित ‘उद्दात’ हेतूने शासनाच्या विविध योजना, अभियानांची माहिती, पर्यावरण निर्देशांक तसेच हॉटेल व व्यावसायिकांच्या जाहिराती प्रसारित करण्यासाठी या डिजिटल स्क्रीन बसवण्यात येणार होत्या. प्रत्येक स्क्रीनची किंमत नऊ ते दहा लाख रुपये इतकी असून शहरातील पाच ठिकाणी त्या उभारण्याचा आराखडा होता. याअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक, द क्लब चौक, महाड नाका परिसर व पेटीट लायब्ररी या प्रमुख व वर्दळीच्या ठिकाणी चार डिजिटल स्क्रीन बसवण्यात आल्या. पाचवी स्क्रीन वेण्णालेक येथे बसवण्यात येणार होती. मात्र, ही पाचवी स्क्रीन आजतागायत बसवलीच गेली नाही. उलट ती पालिकेच्या मालकीची असूनही द क्लबच्या मैदानात बेवारस अवस्थेत पडून आहे.
जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम म्हणून या योजनेची पाठ थोपटून घेणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना या लाखोंच्या मालमत्तेकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे दिसून येत आहे. उघड्यावर पडून राहिल्याने या स्क्रीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, या डिजिटल स्क्रीनवरून मिळणारा जाहिरात महसूल आणि त्यावर होणारा अवाढव्य वीजखर्च याचा हिशोब तरी कधी होणार, की याचा भुर्दंड शेवटी पालिकेलाच सहन करावा लागणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.