सोनगाव येथील कचरा डेपोतील आग आटोक्यात आली असली तरी ढिगारे धुमसत आहेत.  
सातारा

Satara News : सातारा पालिकेत ठेकेदाराची झाडाझाडती

सोनगाव डेपोत कचऱ्याचा डोंगर कायम : आरोग्य विभाग प्रमुखास नोटीस

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सोनगाव कचरा डेपोला लागलेल्या आगीने कचरा विलगीकरण व घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे पितळ उघडे पाडले. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी इंदोरच्या सेव्ह अर्थ या एजन्सीला काम देण्यात आले. मात्र, या एजन्सीने हे काम ठाण्याच्या सब ठेकेदारास दिले. महिन्याला सुमारे साडे दहा लाखांचे बिल अदा केले जात असताना सोनगाव कचरा डेपोवर मात्र कचऱ्याचा डोंगर कायम राहिल्याने ठेकेदार व आरोग्य विभाग प्रमुख राकेश गलियल यांची पदाधिकाऱ्यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. संबंधित ठेकेदार तसेच कामात हलगर्जीपणा केल्याने राकेश गलियल यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिले.

सोनगाव कचरा डेपोवरील कचऱ्याने पेट घेतल्याने सोनगाव परिसरात धुराने नागरिकांचा जीव कासावीस झाला आहे. प्रचंड प्रदूषण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा सोनगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. याची दखल घेऊन नगराध्यक्ष अमोल मोहिते व आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांना निवेदन देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेत नगराध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. यावेळी आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक रवींद्र ढोणे, राजू गोरे, विश्वतेज बालगुडे, नगर अभियंता दिलीप चिद्रे, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वठारे, आरोग्य विभाग प्रमुख राकेश गलियल तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते.

बैठकीत सुरूवातीला संबंधित सब ठेकेदाराकडून निविदा प्रक्रियेनुसार करण्यात येणाऱ्या कामकाजाची माहिती घेण्यात आली. घनकचरा प्रकल्पाची क्षमता 100 टन प्रतिदिन प्रक्रियेची आहे. मात्र, शहरातून प्रतिदिन 120 टन कचरा येत आहे. बायो मायनिंग प्रकल्पातून अपेक्षित काम न झाल्याने पूर्वीचेच कचऱ्याचे डोंगर कायम होते. त्यामुळे संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावता आली नसल्याचे ठेकेदाराने सांगितले. दिलीप चिद्रे म्हणाले, बायो मायनिंग प्रक्रिया राबवून कचरा डेपोवरील संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्याचे फोटो तसेच पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले. राकेश गलियल यांनी प्रतिदिन 60 ते 70 टन कचरा शहरातून डेपोवर जात असल्याचे सांगितले. यावेळी आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी आक्रमक भूमिका घेतली. कचरा डेपोवर नगरपालिकेने ठरवल्यानुसार काम होत नाही. कचरा पेटल्यामुळे डेपोवरील इतर साहित्य आगीत भस्मसात होऊन नुकसान झाले. त्यामुळे या ठेकेदारावर कारवाई करावी. तसेच आरोग्य विभाग प्रमुखांकडूनही दुर्लक्ष झाल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी धनंजय जांभळे यांनी केली.

नगराध्यक्ष अमोल मोहिते म्हणाले, कचऱ्याने पेट घेतल्याने परिसरातील नागरिकांकडून तक्रारी येऊ लागल्या आहेत. कचरा विलगीकरण केले जात नाही. घनकचरा प्रकल्पाद्वारे कचऱ्याची विल्हेवाट का लावली जात नाही? प्रकल्पाची क्षमता पुरेशी असून ठेकेदाराने सतत प्रकल्प सुरू का ठेवला नाही? संबंधित काम देताना सोनगाव कचरा डेपोवरील संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट पालिकेकडून लावण्यात आली होती. मात्र, ठेकेदाराकडून काम व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. चार दिवसांपासून पेटलेल्या कचऱ्यावर टँकरने पाणी मारावे लागत आहे. कचऱ्याची विल्हेवाट लागत नसल्याने मूळ हेतू साध्य होत नाही. संबंधित ठेेकदाराला नोटीस द्यावी. तसेच ठेकेदाराच्या अनामत रक्कमेतून नगरपालिकेचे झालेले नुकसान वसूल करावे, असे आदेश नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT