सातारा : सातारा पालिकेतील सभांमध्ये विषयपत्रिकेवरील विषय वाचन सुरू असतानाच मंजूर.. चला पुढे.. मंजूर असे डी. जी. बनकर म्हणतात. पालिकेत बनकरांची हुकूमशाही आहे का? ते शहाणे झालेत का? बनकरांना काय अधिकार आहे? त्यांची हुकूमशाही मोडीत काढणार असून, उगीच कुणी शहाणपणा करायचा नाही, अशा शब्दांत बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांनी उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांच्यावर पालिकेच्या सभेतच टीकास्त्र सोडले.
त्यावर सभागृहात नीट बोलायचं. भाषा नीट वापरायची, असा इशारा बनकरांनी खंदारे यांना दिला. बनकर - खंदारे यांच्यातील खडाजंगीने पालिका सभेचा आखाडा झाला. नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तरे मिळत नसल्याने नाराज होऊन नगरसेविका मुक्ता लेवे यांनी सभागृहातून वॉकआऊट केले.
पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. सभेसमोर 54 विषय चर्चेसाठी होते. मात्र, ऐनवेळच्या विषयांनी सभेच्या कामकाजास वेगळे वळण लागले.
खंदारे यांनी सभागृहात हुकूमशाही सुरू असून, त्यामुळे नुकसान होत असल्याचा आरोप केला. पूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभा व नुकत्याच झालेल्या स्थायी सभेत विषयपत्रिकेवरील विषय न वाचताच चला मंजूर.. पुढे असे म्हणून ॲड. डी. जी. बनकर हुकूमशाही गाजवत आहेत. उपनगराध्यक्षांना काय अधिकार आहे? सभागृहात सुरू असलेली हुकूमशाही ही सर्व नगरसेवकांची खंत आहे. माळवदे बोला तुम्ही. कुणी आला तर त्याला पोवई नाक्यापलीकडे गुंडाळून टाकू. कुणाला घाबरायचं नाही. सर्वांनी मिळून ही हुकूमशाही मोडीत काढून टाकू. यांच्या विरोधात कुणी बोलत नाही म्हणून मोगलाई लागली काय? नगरसेवकांनी चुकीच्या पदाधिकाऱ्यां द्वारे पत्रव्यवहार करू नये. ज्या पदाधिकाऱ्यांना अधिकार नाही, त्यांच्याकडे अर्ज न देता माझ्या विभागाचे काम थेट मला सांगितले तर ते पटकन होईल, असाही टोला खंदारे यांनी नाव न घेता बनकर यांना लावला. त्यामुळे सभेत गदारोळ उडाला.
ॲड. डी. जी. बनकर म्हणाले, सभागृहात नीट बोलायचे. कायदा वाचायचा. आमच्या अधिकारात जे आहे ते आम्ही करणार. कोण कुणाचं काय करतंय ते बघू. शांतपणे ऐकून घेतोय म्हणजे आम्हाला बोलता येत नाही असं समजू नका, असा इशारा बनकर यांनी दिला. नगरसेवक पंकज चव्हाण यांनीही या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र वाद विकोपाला गेला.
नगरसेविका मुक्ता लेवे म्हणाल्या, अधिकारी उत्तरे देत नाहीत. सभागृहात माहिती देताना पुरावे सादर करत नाहीत. सभागृहाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई केली? असा सवाल त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, एक वेतनवाढ रोखण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिली. मात्र, कामकाजाच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सभागृहात मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करत मुक्ता लेवे यांनी सभात्याग केला.