सातारा : सातारा पालिकेने वाढती अतिक्रमणे व रस्ता रूंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी समर्थ मंदिर चौक ते बोगदा मार्गावर केलेल्या कारवाईत 7 मिळकती पाडल्या असून 23 मिळकतींची अतिक्रमांना दणका दिला. कारवाई होणारच याची खात्री पटल्याने अनेक मिळकतदारांनी अतिक्रमणे काढून घ्यायला सुरूवात केली. पक्की घरे, घरासमोरील संरक्षक भिंती, पायऱ्या, कठडे, छत हटवण्यात आल्याने रस्ता रूंद झाला.
साताऱ्यातील शाहू चौक-समर्थ मंदिर चौक ते बोगदा या मार्गाचा सतत वाहतूक कोंडी होत असते. परळी तसेच कास पठार परिसराकडे जा-ये करणारी मोठी वर्दळ या मार्गावर असते. या मार्गावर सातत्याने अतिक्रमणे होत गेल्याने हा मार्ग अरूंद बनला आहे. अनेक ठिकाणी तात्पुरते साहित्य, बंद पाडलेली वाहने, तात्पुरते पार्किंग केले जात असतानाच त्यामध्ये अतिक्रमणांची भर पडली. नव्या इमारती बांधताना सोडलेल्या सेटबॅकमध्ये व साईड मार्जिंनच्या जागेतही अतिक्रमणे झाल्याने परिस्थितीत सुधारणा होत नव्हता.त्यामुळे हा रस्ता दिवसेंदिवस आक्रसत गेल्याने अतिक्रमण कारवाई करणे आवश्यक बनल्याने सातारा पालिका प्रशासनाने बडगा उगारला.
वाहतुकीचे कोंडाळे सतत निर्माण होत असलेल्या समर्थ मंदिर चौक परिसर दिवसेंदिवस गुंतागुंतीचा बनला. अतिक्रमणे आणि जीर्ण झालेल्या इमारतीचाही धोका वाढला. अशा परिस्थितीत सातारा पालिकेच्या शहर नियोजन विभागाने संबंधित 52 मिळकतदार तसेच अतिक्रणधारकांना कारवाईच्या इशारा नोटिसा धाडल्या होत्या. गेल्या दहा वर्षांपासून याबाबत पाठपुरावा सुरू असूनही दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सातारा पालिकेने गेल्या आठवड्यात सुरूवातील पाच मिळकतींना बुलडोझर लावला. त्यानंतर सोमवारी कारवाईचा मोठा धमका करत 20 मिळकती जमीनदोस्त केल्या.
कारवाईचा हा सिलसिला मंगळवारीही सुरू राहिला. 7 मिळकती जमीनदोस्त करत 23 इमारतींची अतिक्रमणे जेसीबीने हटवण्यात आली. सातारा पालिकेने कायद्याचा आधार घेत कारवाई केल्याने मंगळवारी विरोध झाला नाही. कितीही अडथळे आणले तरी कारवाई होणार असल्याचा अंदाज आल्याने मिळकतदारांचा विरोध मावळला असून स्वत:हून अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. समर्थ मंदिर चौकातील मंदिरही काढण्यात आले.
मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव विभाग प्रमुख प्रशांत निकम, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वठारे, नगर अभियंता दहिफळे, विद्युत अभियंता अविनाश शिंदे यांच्यासह शहर नियोजन विभाग, स्थावर जिंदगी विभाग व आरोग्य विभागातील अधिकारी व शेकडो कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.