सातारा : सातारा पालिकेतील सार्वजनिक बांधकाम समिती, शिक्षण क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती, नियोजन आणि विकास समिती, महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापी तसेच दुर्बल विशेष कल्याणकारी समिती सभापती निवडी बिनविरोध झाल्या. तसेच स्थायी समिती सदस्यपदी तिघांची वर्णी लागली. पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी संबंधित सभापतींच्या नावाची घोषणा केली.
सातारा पालिकेची विशेष सभा श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी पार पडली. सभापती व उपसभापती, विषय समिती सदस्यांची निवड करण्यासाठी ही सभा बोलावण्यात आली होती. विषय समित्यांच्या सदस्यपदासाठी दुपारी 12 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या नामनिर्देशपत्रांची छाननी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केली. त्यानंतर संबंधित सात समित्यांमधील सदस्यांच्या नावाची घोषणा त्यांनी केली. या सदस्यांतून सभापती निवडीची प्रक्रिया त्यानंतर पार पडली.
प्रत्येक विषय समितीसाठी एकच नामनिर्देशपत्र प्राप्त झाले व छाननीमध्ये ते वैध ठरल्यामुळे सहा सभापती व एका उपसभापतीची निवड बिनविरोध झाली. त्यामध्ये स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी धनंजय जांभळे, सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी विनोद ऊर्फ बाळू खंदारे, शिक्षण क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती शंकर किर्दत, नियोजन आणि विकास समिती सभापतीपदी अशोक शेडगे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी मोनिका घोरपडे तर उपसभापतीपदी सुजाता गिरीगोसावी तर दुर्बल घटक विशेष कल्याणकारी समिती सभापतीपदी संकेत साठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नगराध्यक्ष अमोल मोहिते हे स्थायी समितीचे तर उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर हे पाणीपुरवठा समितीचे पदसिद्ध सभापती आहेत. स्थायी समितीमध्ये इतर सर्व सभापती हे सदस्य असून त्याशिवाय नगरसेवक जयवंत भोसले, नगरसेवक सूर्यकांत ऊर्फ राजू गोरे व नगरसेविका सुजाता राजेमहाडिक यांनी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. दरम्यान, नूतन सभापतींनी आपापल्या विभागात जावून पदभार स्वीकारला. नगरसेवक, नागरिकांसह कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.