सातारा : राज्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून ओळखल्या जाणार्या सातारा नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर तर हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. जून महिन्यात ताब्यात मिळणार्या इमारतीसाठी प्रत्येक दोन महिन्यांनी नवा मुहूर्त शोधला जात आहे. १ ऑगस्टचा मुहूर्त हुकल्यावर आता १ ऑक्टोबरची नवी तारीख काढली आहे. आता हा नवा मुहूर्त साधला जाणारा का, असा प्रश्न नगरसेवक करू लागले आहेत.
सातारा पालिकेची जुनी इमारत अत्यंत तोकडी आहे. शहराची हद्दवाढ झाल्यानंतर तर पदाधिकार्यांच्या दालनात नागरिकांना बसण्यासाठीही जागा पुरत नाही. अशातच नगरसेवक किंवा इतर पदाधिकारी आले तर आधीच खुर्च्यांवर बसलेल्या लोकांना उठून जाण्याची वेळ येते. हे अपमानाचे प्रसंग दरदिवशी कुठल्या ना कुठल्या पदाधिकार्याच्या दालनात घडत आहे. सातारा पालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर नव्या प्रशासकीय इमारतीतून कामकाज सुरू होणार, असे सांगण्यात आले; मात्र तसे काही झाले नाही. त्यानंतर १ जूनचा मुहूर्त काढण्यात आला.
मात्र नव्या इमारतीत जाण्याचा योग नगरसेवकांना आलाच नाही. त्यानंतर एक ऑगस्टला पालिकेचा वर्धापन दिन नव्या इमारतीतच साजरा करायचा, अशा बतावण्या करण्यात आल्या. मात्र हा मुहूर्तही हुकला. आता एक ऑक्टोबरला जुन्या इमारतीतून नव्या प्रशासकीय इमारतीत स्थलांतर करण्याची घोषणा केली आहे. गेल्या आठ-नऊ महिन्यात बरेच असे मुहूर्त येऊन गेले, मात्र काम पूर्ण होण्याचे नावच घेत नाही. निवडणुकीनंतर तर इमारतीच्या कामाची गती आणखीनच मंदावल्याचे दिसून येते. बेफिकीरी व प्रशासनाचा ढिसाळ पाठपुरावा यामुळे हे काम रखडतच चालले आहे. नवी इमारत होणार म्हणून जुन्या इमारतीच्या देखभाल-दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी राज्यातील सर्वात मोठी म्हणून ओळखल्या जाणार्या सातारा नगरपालिकेला सध्या अवकळा आली आहे.
इमारतीच्या मधल्या पॅसेजमध्ये अडगळीचे साहित्य पसरलेले आहे. अनेक विभागांना पुरेशी जागा नाही. विभागांची अवस्था पाहून कुणाचही मन खट्टू होईल, असे चित्र आहे. ज्या इमारतीत रोज शेकडो नागरिक येतात, त्या इमारतीची ही दुरावस्था सातारा पालिकेच्या प्रतिमेला काळिमा फासत आहे. सातारा पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे काम २०२१ साली सुरू झाले. काम पूर्ण करण्याची मुदत दोन वर्षांपूर्वीच संपली. गेली आठ-नऊ महिन्यांपासून नव्या इमारतीच्या प्रतीक्षेत्र असलेले नगरसेवक संतापले आहेत.
इमारतीचे काम कधी पूर्ण होणार, असा त्यांचा सवाल आहे. पालिका प्रशासनाने ठेकेदाराला शेवटची मुदत देऊन काम तातडीने पूर्ण करण्यास भाग पाडणे आवश्यक आहे. मुदतीत काम न झाल्यास दंडात्मक कारवाई करावी. दर दोन महिन्यांनी मुहूर्त बदलण्याचा हा प्रकार थांबवून एकदाचे काय ते ठरवावे, अशी मागणी नगरसेवकांतून होत आहे.