सातारा : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या एसटी महामंडळाची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. तिकीट क्रमांक जुळत असतानाही केवळ प्रत्यक्ष तिकीट जवळ नसल्याच्या कारणावरून एका प्रवाशाला पुन्हा नव्याने तिकीट काढण्यास भाग पाडण्यात आले. महामंडळाच्या या भोंगळ कारभारामुळे संबंधित प्रवाशाला भुर्दंड सहन करावा लागला. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
नुकत्याच घडलेल्या एका घटनेने एस.टी. कारभारचे वाभाडे काढले. एक प्रवासी पनवेल-कराड या बसने प्रवास करत होता. मात्र, खालापूर टोलनाका परिसरात बस अचानक बंद पडली. त्यामुळे सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवण्यात आले. या गडबडीत संबंधित प्रवाशाचे तिकीट हरवले. मात्र, तिकीट काढताच त्याने खबरदारी म्हणून तिकीटाचा फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवला होता. यानंतर सर्व प्रवाशांना दुसऱ्या शिवशाही बसमध्ये बसवण्यात आले. बंद पडलेल्या बसच्या वाहकाने प्रवासी यादीसह तिकीट अहवाल शिवशाही बसच्या वाहकाकडे सुपूर्द केला होता. प्रवाशाचे मूळ तिकीट सापडत नसल्याने त्याने आपल्या मोबाईलमधील तिकीटाचा फोटो वाहकास दाखवला. मोबाईलवरील तिकीट क्रमांक आणि वाहकाकडील अहवालातील क्रमांक पूर्णतः जुळत होता.
असे असतानाही संबंधित शिवशाही बसच्या वाहकाने वरिष्ठांशी संपर्क साधून प्रवाशाला पुन्हा तिकीट काढावे लागेल, असे सांगितले. प्रवासी तिकीटाचा फोटो दाखवत असून क्रमांकही जुळत असताना त्याला प्रवासास परवानगी देणे अपेक्षित होते. मात्र, नियमांचा अडसर पुढे करत प्रवाशाला परत तिकीट काढायला लावले. सातारा बसस्थानकात संबंधित प्रवाशाने तक्रार दाखल केली असता त्याला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. उलट संबंधित चालक व वाहकांना बोलावून त्यांना पाठबळ देण्यात आले.