St Bus News file photo
सातारा

Satara News : एसटीचे तीन दिवसांत ४ लाख ३९ हजाराचे नुकसान

२४३ फेऱ्या रद्द : आंदोलनामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांची गैरसोय

पुढारी वृत्तसेवा

सातारा : ऊस दरवाढीसाठी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील विविध आगारातील सुमारे २४३ फेऱ्या रद्द झाल्याने ४ लाख ३९ हजार ९१२ रुपयांचा महसूल बुडाला. आंदोलनामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

सध्या दिवाळीचा सण सुरू झाला आहे. त्यामुळे चाकरमनी दिवाळीच्या सुट्टीसाठी गावाकडे परतू लागले आहे. त्यातच ऊस दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले होते. त्यामुळे महामार्ग ब्लॉक झाला होता. आंदोलनामुळे महामंडळाच्या सातारा विभागातील ११ आगारामधील एसटीची चाके थांबली होती. त्यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावरील एसटी वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. गुरुवारी रात्री ऊस दरावर तोडगा निघाल्याने शेतकरी संघटनेने आंदोलन मागे घेतले . त्यामुळे एसटीची वाहतूकही पूर्ववत सुरू झाली आहे.

सातारा आगारातील ४ फेऱ्या रद्द झाल्याने ६० हजार ९६७ रुपये, कराड आगारातील ३६ फेऱ्या रद्द झाल्याने १ लाख १६ हजार ९०५ रुपये,फलटण आगारातील ४ फेऱ्या रद्द झाल्याने ४६ हजार ९४४ रुपये, पाटण आगारातील १८८ फेऱ्या रद्द झाल्याने ७७ हजार ३४२ रुपये, दहिवडी आगारातील ४ फेऱ्या रद्द झाल्याने ३५ हजार १८ रुपये, महाबळेश्वर आगारातील ३ फेऱ्या रद्द झाल्याने ६९ हजार ८९९ रुपये, मेढा आगारातील २ फेऱ्या रद्द झाल्याने १८ हजार ४१७ रुपये, वडूज आगारातील २ फेऱ्या रद्द झाल्याने १४ हजार ४१६ रुपयांचा महसूल बुडाला असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी सचीन शिंदे यांनी दिली.

दरम्यान शुक्रवारी सातारा विभागातील सर्वच्या सर्व आगारातील एसटी वाहतूक सुरळीत सुरु झाली असल्याची माहिती विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT