विशाल गुजर
सातारा : सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रत्येक युद्धात येथील जवानांचा सहभाग मोलाचा आहे. मात्र, गेले चार दिवसात जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. चार दिवसात तीन जवानांना वीरमरण आले आहे. त्यात प्रमोद जाधव (वय 32), विकास गावडे (वय 27) तसेच अभिजित माने (वय 32) या सैनिकांचा समावेश आहे. या सैनिकांच्या जाण्याने त्यांचे कुटुंबियच नव्हे तर जिल्हावासिय गलबलून गेले आहेत.
दरे, ता. सातारा येथील भारतीय सैन्य दलात जवान असलेले प्रमोद जाधव (वय 32) हे पत्नीची प्रसूती होणार असल्याने 1 महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते. प्रमोद जाधव 2014 साली भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. सध्या त्यांची नियुक्ती लडाख (जम्मू, काश्मीर) येथे होती. पत्नीला प्रसूतीसाठी साताऱ्यातील रुग्णालयात दाखल केले होते. कोणत्याही क्षणी आपल्याला पहिलं बाळ होणार या कल्पनेने जवान प्रमोद जाधव हे हरखून गेले होते. मात्र नियतीच्या मनात दुसरं काहीतरी होत. शुक्रवार दि. 9 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रमोद यांचा वाढे फाटा रस्त्यावरुन भीषण अपघात झाला व त्यात त्यांचा मृत्यू झाला.
भारतीय सैन्य दलातील जवान विकास विठ्ठलराव गावडे (वय 27, रा. बरड, ता. फलटण) यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता मोहिमेदरम्यान सुदान येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. सोमवारी मूळगावी शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रध्वजाने झाकलेल्या पार्थिवास सैन्यदलाकडून मानवंदना देण्यात आली. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या या वीर जवानास उपस्थितांनी अश्रूंनी निरोप दिला शहीद जवान विकास गावडे यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान विकास गावडे 22 सप्टेंबर 2016 रोजी त्यांनी भारतीय सैन्य दलात भरती होऊन बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप, खडकी (पुणे) येथे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी लेह-लडाख, जम्मू-काश्मीर, राजस्थान, पुणे व दिल्ली येथे नाईक पदावर सुमारे आठ वर्षे सेवा बजावली. सध्या ते संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता सेनेअंतर्गत दक्षिण आफ्रिका (सुदान) येथे कार्यरत होते. याच काळात कर्तव्यावर असतानाच त्यांना वीरमरण आले.
भोसे (ता. कोरेगाव) येथील भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान अभिजित संजय माने (वय 32) यांना उत्तर प्रदेशातील बबिना येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराने वीरमरण आले. ही दुर्दैवी घटना सोमवारी घडली. देशसेवेचा ध्यास घेत अभिजित माने 2013 साली भारतीय सैन्यात भरती झाले होते. ते भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत होते. सोमवारी कर्तव्यावर असताना ते परेडसाठी दाखल झाले होते. त्यावेळी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. त्यांचे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पाडळी (ता. सातारा) येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयात झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी थेट सैन्य सेवेचा मार्ग स्वीकारत देशाच्या रक्षणासाठी स्वतःला वाहून घेतले होते. या तिन्ही जवानांच्या वीरमरणाने जिल्हा हळहळून गेला आहे.
जिल्ह्यातील 300 जवान झाले हुतात्मा
भारतमातेच्या संरक्षणासाठी वीरांचा जिल्हा असणाऱ्या सातारा जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे. भूमीचे रक्षण करताना निधड्या छातीने लढून या वीरांनी प्राणांची आहुती दिली आहे. स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास असणाऱ्या या जिल्ह्याने आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चांगलेच ठेचले आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धापासून इतिहासाचा धांडोळा घेतल्यास भारताविरोधात ज्या देशांनी युद्ध पुकारले, त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी सातारकरांनी आपल्या रक्ताचा अभिषेक घातला आहे. आतापर्यंत 300 हून अधिक जवान जिल्हयातील शहीद झाले.