सातारा : एव्हरेट बेस कॅम्प... किलोमंजारो... माऊंट एलब्रुस... ही शिखरे म्हणजे गिर्यारोहकांसाठी आव्हानाच. ही तिन्हीही आव्हाने अवघ्या 13 वर्षीय मुलगी पार करते, तेव्हा हे आश्चर्यच वाटते. हो, अशी आश्चर्यकारक कामगिरी साध्य केली आहे, सातार्यातील धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिने. उणे 14 अंश सेल्सिअस तापमानात तब्बल 5 हजार 642 मीटर उंचीचे शिखर सर करण्याची किमया करत करत धैर्याने सातार्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
धैर्याने युरोप खंड व रशिया येथील माऊंट एलब्रुस हे शिखर सर केले. दोन मृत ज्वालामुखींपासून बनलेले हे शिखर असून, त्याची समुद्र सपाटीपासून उंची तब्बल 5 हजार 641 मीटर (18 हजार 510 फूट) एवढी आहे. सगळीकडे बर्फच बर्फ, अशा स्थितीतून धैर्याचा शिखर चढण्याचा प्रवास सुरु झाला. पहिल्या दिवशी मिनरली ओडी या गावी पोहोचली. दुसर्या दिवशी आजाऊ येथे पोहाचत तिने 3 हजार मीटर उंचीचा ट्रेक चढाई केली. तिसर्या दिवशी बेस कॅम्प असलेले माऊंटन हंट येथे पोहोचली. चौथ्या दिवशी 4 हजार 600 ते 4 हजार 800 मीटर इतकी उंची तिने सर केली. पाचव्या दिवशी यशस्वी चढाई करत तिने माऊंट एलब्रुस शिखरावर तिरंगा फडकवला.
हा ट्रेक गिर्यारोहक प्रियंका मोहिते यांच्या बंगळुरु येथील कंपनीतर्फे आयोजित केला होता. तिच्याबरोबर प्रियंका मोहिते व अन्य तिघे ट्रेकर सहभागी होते. धैर्या या मोहिमेतील सर्वात लहान मुलगी आहे. धैर्याने गत एप्रिल महिन्यात एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिम पूर्ण केली होती. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी, तिही आई-वडिल, पालकांशिवाय बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या देशातील पहिली मुलगी ठरली होती. हा कॅम्प 5 हजार 545 मीटर इतका उंचीचा आहे. धैर्याने दररोज 10 ते 15 किलोमीटर असे चालत तब्बल 14 दिवसांमध्ये 130 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला होता. तोही मायनस 10 डिग्री तापमानामध्ये. एव्हरेस्टवेळी वार्षिक परीक्षा असताना, तर आता सहामाही परीक्षा असतानाही तिने पहाटे चार वाजता तसेच संध्याकाळीही सराव केला आहे.
सहा वर्षांपासून ट्रेकिंगचा छंद धैर्या हिला लागला आहे. तिला गिर्यारोहक प्रियंका मोहिते, गिर्यारोहक कैलास बागल यांच्या मार्गदर्शन सातत्याने लाभत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष, सातारा जनता सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी, शिक्षिका सौ. ज्योती कुलकर्णी यांची ती मुलगी असून, त्यांची प्रेरणा तिला बळ देत असते. धैर्या ही येथील गुरुकूल स्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. धैर्याचे कामगिरी संपूर्ण सातारकरांसह देशवासीयासाठी अभिमानास्पद आहे.
पालकांशिवाय उंचवतेय ’मान’
12-13 वर्षांची मुले पालकांच्या मागे-पुढेच करताना दिसत असतात. काही करायचे म्हटले की सोबत पालक हवेतच. मात्र, धैर्याने तिन्हीही शिखर आई-वडिलांशिवाय सर केली आहेत. स्वप्नवत भरारी घेण्यासाठी इच्छाशक्ती, जिद्द, धाडस, चिकाटी, धैर्य आदींचे बळ सोबत घेवून ती सर्वांची मान उंचावणारी कामगिरी करत आहेत. धैर्याने वयाच्या 12 वर्षी आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले किलीमंजारो शिखर सर केले होते. ते शिखर सर करणारी ती देशातील पहिली लहान मुलगी ठरली. त्यानंतर आता तिन्हे माऊंट एलब्रुस शिखर सर केले.
अजिंक्यतारा ते एलब्रुस... व्हाया एव्हरेस्ट
धैर्याची कामगिरी म्हणजे ’एव्हरेस्ट’सारखीच. सातार्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर चढाई करणारी धैर्या आता जगातील सर्वात मोठमोठी शिखरे सर करु लागली आहे. तिचा सराव म्हणजे तिच्यातील ’धैर्या’ला समाल करावा, असाच आहे. सकाळी साडेतीन- चार वाजता तिचा सराव सुरु होतो. अजिंक्यतारा किल्ला, यवतेश्वर, सांबरवाडी सुळका, जानाई-मळाई डोंगर, जरंडेश्वरचा डोंगर ही तिची ट्रेकींगची ठिकाणे.पायात किलो-किलोची वजन बांधून तिचा सुरु असलेला सराव तिची जिद्द, मेहनतीचे दर्शन घडवतो.