खटाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोळ परिसरात बुधवारी दुपारनंतर साडेचार वाजता गारपीट झाली. गारांसह झालेल्या पावसाने शेतातील उभी पिके भुईसपाट झाली, तर शेतात काढून ठेवलेली पिकेही भिजल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
खटाव तालुक्याच्या उत्तर भागात बुधवारी दुपारनंतर ढगाळ हवामान तयार झाले होते. खातगुण, डिस्कळ परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मोळ परिसरात साडेचार वाजता गारांसह जोरदार पाऊस झाला. शेतात सर्वत्र गारा पसरल्या होत्या. रब्बी पिकांच्या काढणीची सुगी सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक शेतकऱ्यांचा गहू, ज्वारी, हरभरा काढून शेतात पडला होता. हा सगळा शेतीमाल
पावसाने भिजून गेला. शेतात उभी असलेली गहू आणि ज्वारीची पिके गारांच्या पावसाने भुईसपाट झाली. जनावरांसाठीचा कडबाही भिजल्याने पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गारांसह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. धुमाळवाडी, गिरवी परिसरात गारपीट; द्राक्ष व फळबागांचे नुकसान
फलटण : फलटण तालुक्यातील धुमाळवाडी, गिरवी व निरगुडी परिसरात बुधवारी दुपारी गारपिटीसह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. या गारपिटीचा द्राक्षबागा, आंबा व इतर फळपिकांना फटका बसला आहे.
अवकाळी गारपिटीमुळे नुकतीच खरड छाटणी केलेल्या द्राक्षबागांना मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच आंबा व इतर फळपिकांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वाऱ्यामुळे काही फळ पिकांना ईजा पोहोचली आहे. काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकालाही या पावसाचा फटका बसला आहे. जोरदार वारा आणि पावसामुळे शेतातील गहू पिक भुईसपाट झाले आहे. अनेक ठिकाणी गव्हाची काढणी मळणी सुरू असून अचानक आलेल्या पावसामुळे त्यामध्ये व्यत्यय आला. धुमाळवाडी, गिरवी हा परिसर फळबागांसाठी ओळखला जातो. मात्र अचानक झालेल्या या गारपिटीमुळे शेतकरी धास्तावले आहेत.