सातारा : महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र सातारा जिल्ह्यासाठी मंजूर केले. सातारा नगरपालिकेच्या सहकार्याने व टाटा समूहाच्या माध्यमातून ८७ कोटी रुपयांचे केंद्र उभे राहत असून, याद्वारे इंजिनिअरिंग व उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांना उच्च दर्जाचे स्किल डेव्हलपमेंट व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पदवीधरांना फायदा होणार आहे. पदवीधर तरूणांच्या उज्वल भविष्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पुणे पदवीधर मतदार संघातील भाजपा उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना जिल्ह्यातून भरघोस मताधिक्क्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
सातारा व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. मनोजदादा घोरपडे, डॉ. स्मिता जाधव, भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा तेजस्विनी घोरपडे, सुनेशा शहा, जि.प. सदस्य अजित साळुंखे, मदन काळभोर, सागर शिवदास, रणजीत जाधव, सातारच्या उपसभापती सुषमा जाधव, कराडच्या उपसभापती अनिता वेताळ, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, निशांत गवळी, अमित कुलकर्णी, श्रीरंग काटेकर, यांच्यासह भाजपा व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ना. शिवेंद्रराजे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. स्मिता जाधव यांना विजयी करण्याची जबाबदारी जिल्ह्यावर दिली आहे. डॉ. स्मिताताई सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे आपण सर्व पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मिळून त्यांच्या विजयासाठी घरोघरी पोहोचायचे आहे. सातारा जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढवण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ताकदीने काम करावे. राजकीय इतिहास पाहता डॉ. डी.वाय. पाटील आणि पी.डी पाटील यांचे कुटुंब तसेच 'पुढारी' परिवार हा जिल्ह्याशी ४०-४५ वर्षांपासून जोडलेला आहे. यापूर्वीच्या निवडणुका आणि राजकीय घडामोडींमध्ये या कुटुंबांचे आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून मोठे योगदान राहिले आहे. आज भाजपच्या बाजूने आणि महायुतीच्या बाजूने अनुकूल वातावरण असून, जनतेचा विश्वास महायुतीवर आहे. महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रत्येक बुथवर नियोजन करावे. सर्व आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागात लक्ष घालून मतदारांशी संपर्क ठेवावा आणि विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावावी, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या, पुणे विभागातील ५८ तालुक्यांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे, उद्योगांना पूरक इन्क्युबेशन सेंटर आणि स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण सुविधा निर्माण करणार आहे. या केंद्रांच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ आश्वासने न देता कामकाजात पारदर्शकता ठेवणार आहे. निवडून आल्यानंतर दर तीन महिन्यांनी केलेल्या कामाचा अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच पदवीधरांच्या अडचणी, सूचना आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी हेल्पलाइन सुरू करणार आहे. तालुकास्तरावर उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि नवउद्योजकांसाठी इन्क्युबेशन सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. एमपीएससी आणि यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये जावे लागते. त्यामुळे पालकांवर आर्थिक भार पडतो. ही अडचण कमी करण्यासाठी तालुकास्तरावर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध करून देण्यात येईल. शिक्षण क्षेत्रातील २५ वर्षांचा अनुभव आणि 'पुढारी कस्तुरी क्लब'च्या माध्यमातून महिलांसाठी केलेले सामाजिक कार्य यांचा संगम साधत पदवीधरांच्या विकासासाठी काम करणार असल्याची ग्वाही डॉ. स्मिता जाधव यांनी दिली.
यावेळी नगरसेवक रिना भणगे, राहूल शिवनामे, विक्रांत भोसले, वैशाली टंकसाळे, प्रियंका पळसे, सुनीता सुतार, कोमल यादव, माधवी पाटसुपे, मानसिंगराव मोरे,धनाजीराव जाधव, रणजित माने, सुरेश पाटील, प्रमोद गायकवाड, महेश जाधव, लालासाहेब पाटील, गणेश जाधव, यांच्यासह पदवीधर मतदार, शिक्षक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तेजस्विनी घोरपडे यांनी आभार मानले.
महायुती ऐतिहासिक विजय मिळवेल : आ. मनोजदादा घोरपडे
आ. मनोजदादा घोरपडे म्हणाले, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कराड दौऱ्यानंतर मतदारसंघातील संपूर्ण यंत्रणा अधिक वेगाने कामाला लागली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तळागाळातील मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याच्या माध्यमातून घरोघरी जावून संपर्क साधला जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखत मतदान केंद्रस्तरावर नियोजन करण्यावर भर दिला आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सात हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यातून महायुतीचे डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे हे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्य मिळवून ऐतिहासिक विजय मिळवतील, असा विश्वास आ. घोरपडे यांनी व्यक्त केला.