धनंजय क्षीरसागर
वडूज : ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सोनिया गोरे यांनी अलीकडच्या काळात खटाव तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे राजकीय चित्र दिसत आहे. खटाववरील गोरे कुटुंबीयांचे वाढते लक्ष राजकीय क्षेत्रातील जाणकारांच्या भुवया उंचावणारे ठरत असून, आगामी काळातील संभाव्य राजकीय समीकरणांची ही नांदी आहे का? याची चर्चा आता रंगू लागली आहे.
मागील चार दिवसांपूर्वी राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या पुसेगाव येथील शिक्षण संस्थेत झालेल्या कार्यक्रमाला मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती असो किंवा आगामी गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर वडूज येथे सौ. सोनिया गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणारा दहीहंडी सोहळा असो; मागील सहा महिन्यांतील राजकीय घडामोडींचे सिंहावलोकन केले असता गोरे कुटुंबीयांचे खटाववरील वाढते लक्ष स्पष्टपणे जाणवते.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठी स्पर्धा असतानाही ना. गोरे यांनी आपल्या घरातील उमेदवाराला डावलून खटावच्या डॉ. प्रिया शिंदे यांच्या निवडीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर विषय समित्यांच्या निवडीतही अध्यक्षांच्या तालुक्यातील पुसेसावळीच्या सौ. तेजस्विनी विक्रमसिंह कदम आणि बुध गटाच्या सदस्या सौ. लता अविनाश कर्णे यांना अनुक्रमे अर्थ व शिक्षण तसेच कृषी सभापतीपद मिळवून देण्यात ना. जयकुमार गोरेंचा मोठा वाटा राहिला.
सातारा-सांगली विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीने तर या राजकीय समीकरणांना आणखी वेग दिला. भाजपच्या उमेदवारीसाठी खा. उदयनराजे भोसले हे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांच्यासाठी, तर बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे त्यांचे व्याही व कडेगावचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासाठी आग्रही होते. पाटणचे माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासह सांगली जिल्ह्यातील काही मातब्बरांचीही नावे चर्चेत होती. या सर्व स्पर्धकांना मागे टाकत ना. गोरे यांनी आपले कट्टर समर्थक धैर्यशील कदम यांच्यासाठी उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले. त्यानंतर धैर्यशील कदम आमदार झाले. त्यांच्या रूपाने खटावला विधान परिषदेत हक्काचा आमदार मिळाला आहे. या राजकीय खेळीमुळे जयाभाऊंनी खटावमधील तीन जिल्हा परिषद मतदारसंघांवर आपला प्रभाव अधिक मजबूत केल्याचे मानले जात आहे. तर मुळात मंत्री गोरे यांच्या माण विधानसभा मतदारसंघातील कातरखटाव व मायणी या दोन जिल्हा परिषद गटांसह वडूज नगरपंचायतीवर त्यांची मजबूत पकड आहे.
औंध जिल्हा परिषद गटात बंधू अंकुश गोरे सक्रिय आहेत. त्यातच सौ. सोनिया गोरे यांनी गटातील प्रत्येक गावात स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केल्याचे चित्र आहे. निमसोड जिल्हा परिषद गटातील राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी नंदकुमार मोरे यांना जिल्हा बँकेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे खटाव तालुक्यातील विविध भागांत गोरे समर्थकांचे जाळे विस्तारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. भविष्यात विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि माण विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला, तर ना. जयकुमार गोरे अथवा सौ. सोनिया गोरे आपला मोर्चा खटाव विधानसभा मतदारसंघाकडे वळवतील का? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. आजच्या घडीला खटावमध्ये गोरे कुटुंबीयांनी निर्माण केलेले राजकीय नेटवर्क पाहता भविष्यातील या शक्यतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येणार नाही.