सातारा : भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून सौ. स्मितादेवी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांना पदवीधर मतदारसंघातून निवडून आणू, अशी प्रतिक्रिया राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सातार्यातील हॉटेल महाराजा येथे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकार्यांची बैठक गुरूवारी सायंकाळी पार पडली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघात प्रचारयंत्रणा कशी राबवणार?, असे विचारले असता, मंत्री ना. जयकुमार गोरे म्हणाले, भाजपाचा कार्यकर्ता म्हणून पक्षाचे दोन्हीही उमेदवार निवडून आणणे ही आमची सामूहिक जबाबदारी आहे. दोन्ही उमेदवार ताकदीने व बहुमताने निवडून येतील, असे नियोजन करू.
शेखर गोरे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत छेडले असता ना. गोरे म्हणाले, त्यांना शुभेच्छा असून माण-खटावचे त्यांनाच विचारा, अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी आ. धैर्यशील कदम, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, माजी जि. प. सदस्य अरूण गोरे, हर्षल चिकणे, अनिमेष कुलकर्णी आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.