सातारा

Jaykumar Gore: सलाईन लावून मंत्री जयकुमार गोरे वारी नियोजनात; कर्तव्याला प्राधान्य

मध्यरात्रीपर्यंत वारी मार्ग आणि पंढरपुरात आढावा

पुढारी वृत्तसेवा

खटाव : पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा महासागर. या सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी राज्य सरकार आणि प्रशासन दिवस-रात्र मेहनत घेत आहे. अशा वेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे प्रकृती ठीक नसतानाही कर्तव्याला प्राधान्य देत वारीच्या नियोजनात व्यस्त आहेत. डॉक्टरांनी पुणे किंवा मुंबईत उपचार घेण्याचा सल्ला दिला असला तरी अगदी मध्यरात्रीपर्यंत वारी मार्ग आणि पंढरपूर शहराचा कोपरा न कोपरा फिरुन ते आढावा घेत आहेत. पांडुरंगाच्या आणि वारकऱ्यांच्या सेवेला प्राधान्य देत ना. जयकुमार गोेरे यांंनी दाखवलेली तत्परता चर्चेचा विषय ठरली आहे.

विषाणूजन्य संसर्गामुळे प्रकृती अस्वस्थ असल्याने मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई किंवा पुण्यातील रुग्णालयात भरती होण्यासही सांगण्यात आले आहे, मात्र तब्येतीची पर्वा न करता त्यांनी वारीच्या तयारीत कोणतीही कसूर होऊ दिली नाही. उपचार सुरू असतानाही अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला.

यानंतर स्वतः रात्री उशिरापर्यंत वारी मार्ग आणि पंढरपूर शहरात फिरून त्यांनी वारीच्या तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली. वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या निवास, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, गर्दी नियंत्रण आणि इतर मूलभूत सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. ज्या ठिकाणी सुधारणा आवश्यक वाटल्या, तेथे तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ‘वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा’ या भावनेतून प्रत्येक सुविधा वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने उपलब्ध व्हावी, यावर त्यांनी विशेष भर दिला.

कोणत्याही कारणामुळे भाविकांना गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रकृती ठीक नसतानाही केवळ कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव, वारकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी जपत त्यांनी केलेली ही धावपळ अनेकांना प्रेरणा देणारी ठरत आहे.

आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा आत्मा मानला जातो. लाखो भाविकांच्या सुरक्षित, सुकर आणि सुरळीत दर्शनासाठी प्रत्येक यंत्रणा सज्ज असताना, स्वतःची प्रकृती बाजूला ठेवून मंत्री जयकुमार गोरे यांनी दाखवलेली कार्यतत्परता ही सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि लोकप्रतिबद्धतता दाखवून देत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT