Satara milk adulteration 
सातारा

Satara Milk Adulteration: दूध संघ, वितरकांचा पाश्चरायझेशन प्रक्रियेत घोटाळा

मलई काढून भेसळीच्या दुधाचे मार्केटिंग : टोन्ड, अनटोन्डच्या दर्जावर संशय

पुढारी वृत्तसेवा
आदेश खताळ

सातारा : जिल्ह्यात भेसळखोरांनी उच्छाद मांडला आहे. काही दूध संघ व वितरक वेगवेगळ्या दूध प्रकारांच्या नावाखाली भेसळीचे दूध ग्राहकांच्या माथी मारत आहेत. संकलित केलेल्या दुधाचे पाश्चरायझेशन केल्यावर मलई काढून उरलेल्या निकृष्ट दुधात भेसळ करून ते सेट केले जाते. पाश्चरायझेशन प्रक्रियेतच घोटाळा करून दूध सम्राट गब्बर झाले आहेत.

दूध माफियांकडून पाश्चराईज्ड, टोन्ड, अनटोन्ड, डबल टोन्ड, फुल क्रीम अशी वेगवेगळी गोंडस नावे देऊन दर्जाहीन दूध मार्केटमध्ये आणून सुमारे दीड ते दोन कोटींचा गल्ला दिवसाला जमवला जात आहे. हे दूधाचे प्रकार संशयाच्या भोवर्‍यात अडकले असून अन्न व औषध प्रशासन भेसळखोर दूध माफियांच्या बकोटीला हात घालण्याचे धाडस दाखवणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सातारा जिल्ह्यातून दररोज लाखो लिटर दूध संकलित होऊन दूध संघ व वितरकांकडे येते. पाश्चरायझेशन ही प्रक्रिया दुधातील हानिकारक जिवाणू नष्ट करण्यासाठी असते. मात्र याच प्रक्रियेआड मोठा घोटाळा सुरू असल्याचे समोर येत आहे. पाश्चरायझेशन प्रक्रियेत दूध गरम करताना त्यावर येणारी मलई (क्रीम) काढून घेतली जाते. त्यापासून बटर, तूप, चीज, दही, श्रीखंड यांच्यासारखे जादा किंमतीचे उपपदार्थ बनवले जातात. मलई काढल्याने दुधातील स्निग्धांश (फॅट) व पोषणमूल्ये कमी होतात. यावर पांघरून घालण्यासाठी त्याच दुधात पुन्हा भेसळ केली जाते. हे भेसळयुक्त, पोषणमूल्य कमी झालेले दूध शुद्ध, सकस व पौष्टिक असल्याचे मार्केटिंग करत ग्राहकांना जादा किंमतीने विकले जाते.

दुधाला पाश्चराईज्ड, टोन्ड, अनटोन्ड, डबल टोन्ड, फुल क्रीम अशी गोंडस नावे दूध संघ किंवा दूध वितरकांकडून दिली जात असली तरी त्यातूनही दर्जाहीन दूध ग्राहकांच्या माथी मारले जाते. फुल क्रीम दुधात एफएसएसएआयच्या मानकांनुसार ६ टक्के फॅट व ९ टक्के दुधाचा एसएनएफ असावा लागतो. मलई काढल्याने प्रत्यक्षात या दुधाचे फॅट कमी होते. फॅटचे घटलेले प्रमाण वाढवण्यासाठी स्वस्तात मिळणारे वनस्पती तेल किंवा पामतेलाची भेसळ केली जाते. फुल क्रीमचे लेबल लावून प्रति लिटर ७ ते १० रूपये जादा नफा वितरक किंवा दूध संघ मिळवतात. महागडे म्हणजे शुद्ध दुध असा समज करून घेणार्‍या ग्राहकांचीही शुद्ध फसवणूक होते.

टोन्ड दुधात मानकांनुसार ३ टक्के फॅट व ८.५ टक्के एसएनएफ आवश्यक आहे. मात्र शुद्ध दुधात पाणी व स्किम्ड मिल्ड पावडर (एसएमपी) मिसळून त्याचा मेळ घातला जातो. एसएमपी या स्वस्तात मिळणार्‍या पावडरच्या भेसळीने दुधाची गुणवत्ता 'सेट' केली जाते. ग्राहकांना कमी फॅट पण आरोग्यदायी म्हणून विकले जाणारे टोन्ड दूध अशापद्धतीने भेसळखोरी करून कृत्रिमरित्या तयार केले जाते.

डबल टोन्ड दूध तयार करताना काही दूध संघ व दूध वितरक गडबड करतात. या प्रकारच्या दुधात १.५ टक्के फॅट असणे आवश्यक आहे. मात्र या दुधात पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. शरीराचे वजन कमी करायचे असेल तर हे दूध प्या आणि वजन कमी करा, अशा पद्धतीने या दुधाचे मार्केटिंग केले जाते. प्रत्यक्षात पाणी व एसएमपी मिसळल्याने या दुधाचे पोषणमूल्य नावापुरते राहते. अनटोन्ड किंवा स्टँडर्डलाझ्ड प्रकारच्या दूधातही घोटाळे केले जातात. या प्रकारच्या दुधाचे फॅट ४.५ टक्के व एसएनएफ ८.५ टक्के असणे आवश्यक आहे. यातही मलई काढून पुन्हा वनस्पती तेल किंवा पामतेल मिसळण्याचे प्रकार केले जातात. निरसे किंवा गावरान दुध म्हणून या दुधाची सर्रास विक्री केली जाते.

दूधाच्या विविध प्रकारांतून ग्राहकांचीआर्थिक लुबाडणूक केली जाते. जिल्ह्यातून दररोज सुमारे ५ ते १० लाख लिटर दुधाचे वितरण केले जाते. प्रति लिटर ५ ते १५ रूपये जादा आकारल्यास रोज सुमारे ५० लाख ते १.५ कोटींची अतिरिक्त कमाई दूध संघ किंवा दूध वितरकांना होते. मलई काढून उपपदार्थ बनवण्यातून मिळणारा कोट्यवधींचा नफा हा वेगळाच आहे. वर्षाकाठी हा आकडा कित्येक कोटींवर जातो.

शुद्ध दुधाच्या नावाखाली भेसळयुक्त दूध माथी मारून ग्राहकांच्या खिशावर दरोडा टाकत आहेत. दूधाच्या पिशवीवरील खोटे दावे, आकर्षक पॅकेजिंग, विश्वासार्ह बँड अशा बाबींना ग्राहक भुलतात. मलई काढून दुधात रसायने मिसळून फुल क्रीम शुद्ध दूध म्हणून विकल्या जाण्यार्‍या दुधातून जिल्ह्यातील दूध संघ व वितरकांनी अब्जावधींची माया गोळा केली आहे. दररोज ग्राहक पैसे मोजत असताना त्यांना भेसळयुक्त व पोषणमूल्यहीन दूध मिळत असल्याने अन्न व औषध प्रशासनाने भेसळखोर दूध संघ व दूध वितरकांच्या बकोटीला हात घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT